इंग्लंडने टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत दमदार सुरुवात केली आहे आणि सुपर-१२ च्या पहिल्याच सामन्यात गतविजेत्या वेस्ट इंडिजचा ८ गडी राखून पराभव केला. इंग्लंडचे लेग-स्पिनर आदिल रशीद आणि मोईन अली यांनी आपल्या फिरकीच्या जाळ्यात वेस्ट इंडिजचे फलंदाज अडकले आणि त्यांचा डाव अवघ्या ५५ धावांवर गुंडाळला. मात्र ५६ धावांचे सोपे लक्ष्य गाठताना इंग्लंडनेही ४ विकेट गमावल्या. त्यांनी ८.२ षटकांत आपले लक्ष्य गाठले. या सामन्यात वेस्टइंडिजच्या नावे एक अतिशय खराब विक्रमाची नोंद झाली.
इंग्लड संघाने वेस्टइंडिज संघाला ५५ धावांवर गुंडाळल्याने टी२० विश्वचषक स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाची निचांकी धावसंख्या नोंदवली गेली आहे. या यादीत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर नेदरलँड्सचा संघ आहे. २०१४ सालच्या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंका संघाने नेदरलँड्स संघाला ३९ धावांवर गुंडाळले होते. ही आजपर्यंतची टी२० विश्वचषकातील निचांकी धावसंख्या आहे.
तसेच चालू २०२१ च्या टी२० विश्वचषकाच्या पात्रता फेरीतील सामन्यात श्रीलंकेच्या संघाने नेदरलँड्सला पुन्हा कमी धावांवर रोखले होते. यावेळी नेदरलँड्सचा डाव ४४ धावांवर गडगडला. ही टी२० विश्वचषकातील दुसऱ्या क्रमांकाची धावसंख्या ठरली होती.
याशिवाय, वेस्ट इंडिजचा संघ त्यांच्या दुसऱ्या सर्वात कमी टी२० क्रिकेटमधील धावसंख्येवर बाद झाला. त्यांची टी२० मधील निचांकी धावसंख्या ४५ धावा अशी आहे. २०१९ मध्ये इंग्लंडविरुद्धच नोंदवली गेली होती.
दरम्यान, या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गनने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. इंग्लंडच्या गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवला. मोईनने ४ षटकांत केवळ १७ धावा दिल्या आणि २ विकेट्स घेतस्या. तसेच आदिल राशीदने २.२ षटकांत २ धावा देत ४ विकेट्स घेतल्या.
वेस्ट इंडिजसाठी फक्त ख्रिस गेल (१३) दुहेरी आकडा गाठू शकला. लेंडल सिमन्स आणि शिमरॉन हेटमायरने हात उघडण्याचा प्रयत्न केला, पण मोईनने दोघांनाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दुसऱ्या टोकाकडून ख्रिस वोक्सने किफायतशीर गोलंदाजी करत एविन लुईसला (६) बाद केले. टायमल मिल्सने गेलला बाद केले. इतर फलंदाजही काही विशेष करू शकले नाही.
वेस्टइंडिजने दिलेल्या ५६ धावांचे माफक लक्ष्य गाठताना इंग्लंडच्या ४ विकेट पडल्या. इंग्लिश संघाला पहिला धक्का जेसन रॉय (११) च्या रूपात मिळाला, त्याला रवी रामपॉलने गेलकरवी झेलबाद केले. यानंतर जॉनी बेअरस्टो (९) याला अकिल हुसेनने त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले, त्यामुळे संघाची धावसंख्या २ बाद ३० अशी झाली.
मोईन अली (२) धावबाद झाला आणि लियाम लिव्हिंगस्टोन (१) पुन्हा हुसेनच्याच चेंडूवर झेलबाद झाला. मात्र, बटलर खेळपट्टीवर टिकून राहिला आणि त्याने संघाला विजय मिळवून दिला. विंडीज संघाकडून हुसेनने ४ षटकात २४ धावा देत २ बळी घेतले, तर रामपॉलला एक विकेट मिळाली.
महत्त्वाच्या बातम्या –
कडक झेल! वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाने स्वत:च्याच चेंडूवर पकडला अद्भुत झेल, पाहून व्हाल हैराण
आदिल राशीदच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला ‘धोकादायक’ आंद्रे रसेल, पाहा कशाप्रकारे झाला क्लीन बोल्ड





