ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील पहिल्याच सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने भारताला ८ गड्यांनी केले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी केलेल्या दिमाखदार गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाज तग धरू शकले नाहीत. परिणामी भारताला एका लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, १९ डिसेंबर या तारखेचा एक अजब योगायोग दिसून आला. भारताने आज (१९ डिसेंबर) आपल्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात निच्चांकी धावसंख्या केली. दुसरीकडे, १९ डिसेंबर याच तारखेला चार वर्षांपूर्वी भारताने आत्तापर्यंतची आपली सर्वोच्च कसोटी धावसंख्या देखील नोंदवली होती.
१९ डिसेंबरला नोंदवली गेली भारताची सर्वात निच्चांकी धावसंख्या
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ आपल्या दुसऱ्या डावात अवघ्या ३६ धावांवर सर्वबाद झाला. भारताचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. ऑस्ट्रेलियाकडून जोस हेजलवूड व पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी ५ आणी ४ बळी मिळवले. ही भारताचे आतापर्यंतची कसोटी क्रिकेटमधील सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे. यापूर्वी, १९७४ मध्ये ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ४२ धावांवर सर्वबाद झाला होता. त्यामुळे, १९ डिसेंबर यादिनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांनी निच्चांकी धावसंख्या नोंदवली गेली.
१९ डिसेंबरलाच भारताने रचली होती सर्वोच्च धावसंख्या
भारतीय क्रिकेट संघाची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या ७५९ आहे. विशेष म्हणजे ही धावसंख्याही १९ डिसेंबर याचदिवशी नोंदवली गेली होती. २०१६ मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघाविरुद्ध चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारताने ही आपली आजवरची सर्वात मोठी धावसंख्या ठोकलेली. याच डावात भारताकडून करूण नायरने ३०३ धावांची अप्रतिम खेळी करत, कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकवणारा दुसरा भारतीय होण्याचा मान मिळवलेला. केएल राहुल दुर्दैवीरित्या १९९ धावांवर बाद झालेला.
अशाप्रकारे, भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील उच्चांकी आणि निच्चांकी धावसंख्या एकाच दिवशी होण्याचा दुर्मिळ योगायोग साधला गेला.
संबधित बातम्या:
– AUS vs IND Test Live : बर्न्सच्या अर्धशतकी खेळीने कांगारूचा भारतावर ८ विकेट्सने विजय; १-० ने घेतली आघाडी
– टीम इंडियाचा लाजीरवाणा पराक्रम आणि माजी खेळाडूंच्या तिखट प्रतिक्रिया, चाहत्यांकडूनही मीम्सचा भडीमार
– अब जिंदा रेहने के लिये बचा ही क्या है! टीम इंडियाच्या वाईट प्रदर्शनानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस