---Advertisement---

इंटरनॅशनल क्रिकेट न खेळताही खेळाडू कशी करतात कमाई?

On: मंगळवार, मे 5, 2020 8:50 PM
---Advertisement---

भारतात क्रिकेटला मोठी लोकप्रियता आहे. अगदी लहान मुलापासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत काही अपवाद वगळले तर सर्वांनाच क्रिकेटबद्दल आकर्षण असते. विशेष म्हणजे आपल्यातील अनेक जणांनी मोठेपणी क्रिकेटर होण्याचे स्वप्न पाहिलेले असते किंवा एकदा तरी आपण मला क्रिकेटर व्हायचे आहे असे म्हटलेलो असतो. पण प्रत्येकाचेच हे स्वप्न पूर्ण होते असे नाही.

पण अनेकजण मेहनतीने आणि जिद्दीने क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण करतात. पण असेही असले तरी त्यातील सर्वांनाच भारतीय संघात संधी मिळते असे नाही. काही क्रिकेटपटूंची कारकिर्द केवळ देेशांतर्गत क्रिकेट पर्यंतच मर्यादीत रहाते. पूर्वी अशा खेळाडूंना मोठा मोबदला मिळत नसे. मात्र २०१८ ला बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या वेतनात २०० टक्के वाढ केली. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेट खेळणारे खेळाडूही चांगली कमाई करु लागले आहेत. त्याच्या जोडीला आयपीएल असतेच.

भारतात वरिष्ठ स्तरावर रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि सईद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी या महत्त्वाच्या देशांतर्गत स्पर्धा होत असतात. या ३ स्पर्धात खेळाडूंना मिळणाऱ्या मोबदल्याचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.

रणजी ट्रॉफी – 

भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाची मानली जाणारी स्पर्धा म्हणजे रणजी ट्रॉफी. देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना सर्वाधिक रक्कम या स्पर्धेतून मिळते. २ ते ३ महिन्यांच्या कालावधील ही स्पर्धा खेळवली जाते. प्रत्येक संघ या स्पर्धेत साखळी फेरीत किमान ८ ते ९ चार दिवसीय सामने खेळतो.

या स्पर्धेत ११ जणांच्या संघात खेळणाऱ्या खेळाडूला सामन्याच्या प्रत्येक दिवशी ३५,००० रुपये मिळतात. म्हणजेच प्रत्येक साखळी फेरीच्या एका सामन्यामागे खेळाडूला १,४०,००० रुपये मिळतात. त्याचबरोबर १००० रुपये असा दैनंदिन भत्ता खेळाडूला मिळतो.

त्यामुळे जो खेळाडू साखळी फेरीतील सर्व ९ सामने खेळतो त्याला १३,३२,००० रुपये मिळतात. तर दैनंदिन भत्ताच्या स्वरुपात ७० ते ७२ हजार रुपये मिळतात.

तसेच ज्या खेळाडूंना ११ जणांच्या संघात संधी मिळत नाही त्या खेळाडूंना अर्धी रक्कम म्हणजेच १७५०० रुपये मिळतात. तसेच दैनंदिन भत्ता मात्र त्यांना सर्व खेळाडूंप्रमाणेच मिळतो.

विजय हजारे ट्रॉफी – 

भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमधील विजय हजारे ट्रॉफी ही वनडे स्पर्धा आहे. ही स्पर्धा साधारण १५ दिवस होते. या स्पर्धेतही प्रत्येक संघ साधारण ८ ते ९ सामने साखळी फेरीत खेळतो. या स्पर्धेत प्रत्येक सामन्यासाठी ११ जणांच्या संघात असणाऱ्या खेळाडूला ३५,००० रुपये मिळतात. तर ११ जणांच्या संघात स्थान न मिळालेल्या खेळाडूला १७२५० रुपये मिळतात.

तसेच दैनंदिन भत्ता म्हणून काही संघातील खेळाडूंना साखळी फेरीतील सामन्यांसाठी १००० रुपये तर बाद फेरीतील सामन्यांसाठी १५०० रुपये मिळतात.

त्यामुळे जो खेळाडू त्याच्या संघाकडून सर्व साखळी फेरीतील सामने खेळतो त्याला साधारण ३,१५,००० रुपये मिळतात. तसेच १५ दिवसांचे दैनंदिन भत्ता म्हणून एका खेळाडूला साधारण १५००० रुपये मिळतात.

सईद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी – 

भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमधील तिसरी महत्त्वाची स्पर्धा म्हणजे सईद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी. टी२० प्रकाराची ही स्पर्धा असून साखळी फेरीत प्रत्येक संघ साधारण ६ ते ७ सामने खेळतो. या स्पर्धेत प्रत्येक सामन्यासाठी ११ जणांच्या संघात खेळणाऱ्या खेळाडूला १७५०० रुपये मिळतात. तसेच ज्या खेळाडूंना ११ जणांच्या संघात संधी मिळत नाही त्या खेळाडूंना ८७५० रुपये मिळतात.

त्याचबरोबर दैनंदीन भत्त्याचे सर्व खेळाडूंना १००० रुपये मिळतात. त्यामुळे केवळ साखळी फेरीच्या सर्व सामन्यांमध्ये खेळणारा खेळाडू १०५००० रुपये कमावतो. तसेच १० हजाराच्या आसपास त्याला दैनंदीन भत्ता मिळतो.

याबरोबरच सामना शुल्कव्यतिरिक्त प्रत्येक खेळाडूला बेनीव्होलंट फंड (benevolent funds) मिळतात. त्यातून खेळाडूला रणजी ट्रॉफीतील प्रत्येक सामन्यामागे ६० हजार रुपये, विजय हजारे ट्रॉफीसाठी २० हजार रुपये आणि मुश्ताक अली टी२० ट्रॉफीसाठी ७ हजार रुपये मिळतात. हे पैसे खेळाडूने निवृत्ती घेतल्यानंतर किंवा दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाल्यानंतर मिळतात.

त्याचबरोबर प्रत्येक खेळाडूला मिळणाऱ्या वेतनाचा टॅक्सही भरावा लागतो.

ट्रेंडिंग लेख –

लाॅकडाऊनमध्ये तब्बल ३० हजार लोकांना जेवण पुरवतोय भारताचा हा स्टार कर्णधार

हे ४ भारतीय आहे ज्यांनी वनडेत गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडले होते

अशी आहे सनरायझर्स हैद्राबादची दमदार ड्रीम ११, हा खेळाडू आहे कर्णधार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---