अमेरिकन ओपन २०२१ स्पर्धा सध्या अखेरच्या टप्प्यात आली आहे. नुकतेच महिलांच्या एकेरी स्पर्धेत १८ वर्षीय एमा रादूकानूने कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जिंकले. असे असतानाच, दुसरीकडे पुरुषांच्या एकेरी स्पर्धेत मोठा इतिहास घडू शकतो. भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी मध्यरात्री सार्बियाचा नोवाक जोकोविच आणि रशियाचा डॅनिल मेदवेदेव हे दोन खेळाडू अंतिम सामन्यात आमने-सामने येणार आहेत.
एकिकडे एमाने पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकले आहे, तर दुसरीकडे जोकोविचला सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा पुरुष टेनिसपटू होण्याचा विश्वविक्रम खुणावतोय. याचबरोबर जोकोविच कॅलेडर ग्रँडस्लॅम पूर्ण करण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. गेल्या काही दिवसांपासून जोकोविच आणि कॅलेंडर ग्रँडस्लॅम सातत्याने चर्चेत आहे. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला असेल की हे कॅलेंडर ग्रँडस्लॅम नक्की आहे तरी काय? त्याबद्दलच आढावा घेऊ.
कॅलेंडर ग्रँडस्लॅम म्हणजे काय?
टेनिसमध्ये दरवर्षी ऑस्ट्रेलियन ओपन, विम्बल्डन, फ्रेंच ओपन आणि अमेरिकन ओपन, अशा ४ ग्रँडस्लॅम स्पर्धा होतात. टेनिसमधील या सर्वात महत्त्वाच्या स्पर्धा मानल्या जातात. या चारही स्पर्धा जेव्हा एखादा खेळाडू त्याच्या कारकिर्दीत कोणत्याही टप्प्यावर जिंकतो, तेव्हा तो करियर ग्रँडस्लॅम पूर्ण करतो.
पण, जेव्हा एखादा खेळाडू या चारही स्पर्धा एकाच वर्षात जिंकतो, तेव्हा तो कॅलेंडर ग्रँडस्लॅम पूर्ण करतो. त्यामुळे आता जोकोविचला कॅलेंडर्स ग्रँडस्लॅम पूर्ण करण्याची संधी आहे. कारण त्याने यापूर्वीच २०२१ वर्षात ऑस्ट्रेलियन ओपन, विम्बल्डन आणि फ्रेंच ओपन या तिन्ही ग्रँडस्लॅम स्पर्धांचे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. आता अमेरिकन ओपन जिंकून तो एकाच वर्षात चारही ग्रँडस्लॅम जिंकण्याचा पराक्रम करु शकतो.
आत्तापर्यंत पुरुष आणि महिला एकेरी गटात कॅलेंडर ग्रँडस्लॅम ५ खेळाडूंनी पूर्ण केले आहे. यात डॉन बज (१९३८), मॉरीन कोनोली (१९५३), रॉड लेवर (१९६२, १९६९), मार्गरेट कोर्ट (१९७०) आणि स्टेफी ग्राफ (१९८८) या खेळाडूंचा समावेश आहे. त्यातही महान टेनिसपटू रोड लेवर यांनी १९६२ व १९६९ साली एकाच वर्षात ४ पैकी ४ ग्रॅंडस्लॅम स्पर्धा जिंकल्या होत्या. त्यांनी कॅलेंडर ग्रॅंडस्लॅम दोनदा जिंकण्याचा कारनामा केला आहे. असा पराक्रम आजपर्यंत पुरुष टेनीसपटूंमध्ये ते सोडून कुणालाही जमला नाही.
त्याचबरोबर स्टेफी ग्राफने १९८८ साली चारही ग्रँडस्लॅम जिंकण्याबरोबरच त्यावर्षी झालेल्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकही जिंकले होते. अशी कामगिरी करणारी ती एकमेव टेनिसपटू आहे. तिने एकाच वर्षात चारही ग्रँडस्लॅम आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकल्याने ‘गोल्डन स्लॅम’ पूर्ण केले होते.
सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा टेनिसपटू होण्याची संधी
आत्तापर्यंत पुरुषांच्या एकेरी गटात राफेल नदाल, रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच यांनी प्रत्येकी २० ग्रँडस्लॅम विजेतीपदं मिळवली आहेत. त्यामुळे सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या यादीत हे तिघेही सध्यातरी संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहे.
पण, आता जर जोकोविचने रविवारी अमेरिकन ओपनचं विजेतेपद जोकोविचने जिंकले तर तो नदाल आणि फेडरर यांना मागे टाकत एकटा २१ ग्रँडस्लॅम विजेकेपदांसह अव्वल स्थानी विराजमान होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी एमाचे घवघवीत यश, यूएस ओपनचे जेतेपद पटकावत रचला इतिहास
सर्वात मोठा इतिहास रचण्यापासून जोकोविच केवळ एक पाऊल दूर, फायनलमध्ये मेदवेदेवशी होणार टक्कर
यूएस ओपन विजेत्या खेळाडूंच्या बक्षिस रकमेत केली गेली कपात, मात्र युवा खेळाडूंची होणार चांदी