सन २००८मध्ये म्हणजेच इंडियन प्रीमिअर लीगच्या पहिल्या वहिल्या हंगामाचा किताब जिंकणारा संघ म्हणजे राजस्थान रॉयल्स होय. याच राजस्थान संघाला तब्बल १४ वर्षांनंतर अंतिम सामना खेळण्याचे भाग्य लाभले. शुक्रवारी (दि. २७ मे) क्वालिफायर २ सामन्यात राजस्थानने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला ७ विकेट्सने पराभूत केले. या विजयामुळे राजस्थानने थेट अंतिम सामन्यात प्रवेश केला. आता हा अंतिम सामना २९ मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात खेळला जाईल. असे जरी असले, तरी राजस्थानविरुद्ध पराभव मिळाल्यानंतर बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याने मोठे वक्तव्य केले आहे.
‘कसोटी क्रिकेट खेळतोय असं वाटत होतं’
बेंगलोर संघाला दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पराभव मिळाल्यानंतर फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) म्हणाला की, “या खेळपट्टीवर नव्या चेंडूने फलंदाजी करणे खूप आव्हानात्मक होते. चेंडू फिरत असतानाही आम्ही पहिल्या सहा षटकांमध्ये फारसे नुकसान न होता चांगल्या धावा जोडू शकलो. पहिल्या सत्रात आम्ही कसोटी क्रिकेट खेळत आहोत असे वाटत होते. कारण, खेळपट्टीवर भरपूर उसळी होती.”
‘१८० धावांचे आव्हान पुरेसे’
पुढे बोलताना डू प्लेसिस म्हणाला की, “आमच्या मते, विजयासाठी १८० धावांचे आव्हान या खेळपट्टीसाठी पुरेसे होते. या आव्हानापर्यंत संघाला न पोहोचण्याव्यतिरिक्त मला माझ्या संघाचा अभिमान आहे. आरसीबीसाठी हा हंगाम चांगला राहिला. प्रेक्षक आमच्यासाठी किती खास आहे, हे या पहिल्या हंगामात नेतृत्व करताना मी जाणून घेतले.”
‘संघावर अभिमान आहे’
दिनेश कार्तिकसह इतर खेळाडूंची भारतीय संघात निवड झाल्याबद्दल वक्तव्य करताना डू प्लेसिस म्हणाला की, “ज्या खेळाडूंना भारतीय संघात निवडले गेले, ते याचे हक्कदार होते. आज आम्ही राजस्थान रॉयल्ससारख्या मजबूत संघासमोर सर्वोत्तम कामगिरी करू शकलो नाही. मात्र, तरीही माझ्या संघावर मला अभिमान आहे.”
‘युवा खेळाडूंना चांगली कामगिरी करताना पाहायचंय’
सध्याच्या हंगामातील कामगिरी आणि युवा खेळाडूंबद्दल चर्चा करताना डू प्लेसिस म्हणाला की, “आमच्या संघात काही उत्तम युवा प्रतिभावान खेळाडू आहेत, आमच्याकडे तीन वर्षांची योजना आहे, तुम्हाला त्यांना चांगली कामगिरी करताना पाहायचे आहे. संघामध्ये सामील झाल्यानंतर रजत पाटीदार चांगली कामगिरी करत असल्याचे तुम्ही पाहू शकता.”
बेंगलोरच्या चाहत्यांचे मानले आभार
शेवटी डू प्लेसिस बेंगलोर संघाच्या चाहत्यांचे आभार मानताना म्हणाला की, “चाहत्यांनी आम्हाला सर्वत्र पाठिंबा दिला, तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला सामन्यादरम्यान आरसीबी-आरसीबीचा आवाज सर्वत्र गाजताना दिसेल. मुंबईत खेळताना हा प्रकार पाहिल्यावर आम्ही खूप भावूक झालो. आमच्या चाहत्यांनी आम्हाला चांगला पाठिंबा दिला आहे, ज्यासाठी मी त्यांचे आभार मानू इच्छितो.”
फाफ डू प्लेसिसची कामगिरी
फाफ डू प्लेसिस याने या हंगामात १६ सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्याने ३१.२०च्या सरासरीने ४६८ धावा चोपल्या. या धावा करताना त्याने ३ अर्धशतकेही झळकावली आहेत. याव्यतिरिक्त त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही ९६ राहिली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘नशीबवान आहोत, की आमच्याकडे तो आहे’, सॅमसनने गायले ‘या’ खेळाडूचे गुणगान
सामना हरला, पण मनं जिंकली! विराटने केले असं काही की होतंय सर्वत्र कौतुक; पाहा Video
तब्बल १०९ वर्षापासून ‘या’ गोलंदाजाचा विक्रम आहे अबाधित; एका दिवसात घेतलेल्या दोन हॅट्रिक