भारतीय संघानं तब्बल 11 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. टीम इंडियानं रोहित शर्माच्या नेतृत्वात 2024 टी20 विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं. सध्या भारतीय संघ आणि चाहते या विजयाचा आनंद साजरा करत आहेत. मात्र काही चाहत्यांना पुढील आयसीसी स्पर्धा कधी होईल? असा प्रश्न पडला असेल. चला तर मग, या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला याबाबत सर्व माहिती देतो.
सध्या 2023-25 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) अंतर्गत कसोटी सामने खेळले जात आहेत. परंतु पुढील आयसीसी स्पर्धा महिला टी20 विश्वचषक आहे, जी 2024 मध्येच खेळली जाईल. ही स्पर्धा बांगलादेशमध्ये आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेला 3 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून अंतिम सामना 20 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. या मेगा स्पर्धेत 10 संघ सहभागी होणार आहेत. साखळी फेरीत दोन गट तयार केले जातील, ज्यामध्ये 5-5 संघांचा समावेश असेल. यानंतर उपांत्य फेरीच्या दोन सामन्यांनंतर अंतिम सामना खेळला जाईल.
या स्पर्धेनंतर 2025 मध्ये आयसीसी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केले जाईल. या स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे असून ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान खेळली जाणार आहे. या स्पर्धेत 8 संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेत यजमान पाकिस्तानला थेट प्रवेश मिळाला असून, विश्वचषक 2023 मधील अव्वल 8 पैकी उर्वरित 7 संघ पात्र ठरले आहेत.
या स्पर्धेनंतर 2025 मध्ये लॉर्ड्सवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जाईल. त्याच वेळी पुढील वर्षी महिला वनडे विश्वचषक देखील खेळला जाणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद भारताकडे आहे.
नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकात भारतीय संघानं जबरदस्त कामगिरी केली होती. टी20 वर्ल्ड कपमध्ये एकही सामना न गमावता ट्रॉफी जिंकणारा भारत पहिला संघ ठरला आहे. या स्पर्धेनंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी20 आंतरराष्ट्रीय मधून निवृत्तीची घोषणा केली.
महत्त्वाच्या बातम्या –
“नेपाळचा संघही त्याला आपल्या टीममध्ये स्थान देणार नाही”, शोएब मलिकनं केला बाबर आझमचा अपमान
जेम्स अँडरसन निवृत्तीनंतरही इंग्लंड संघासोबतच राहणार, मिळणार मोठी जबाबदारी
“हा निर्णय खूपच…” बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांची कोहलीच्या निवृत्तीवर मोठी प्रतिक्रिया