भारतीय क्रिकेटचे पितामह म्हणून महाराजा रणजीतसिंग जी यांना ओळखले जाते. भारतामध्ये क्रिकेटला प्रसिद्ध करण्यामागे रणजीतसिंग जी यांचे मोठे योगदान आहे. इंग्लंडच्या संघाकडून खेळणारे पहिले भारतीय होण्याचा मान त्यांना मिळाला होता. भारतीय क्रिकेटमधील त्यांच्या योगदानासाठी भारतातील सर्वात जुन्या व प्रमुख प्रथमश्रेणी स्पर्धेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. रणजी ट्रॉफी म्हणून आपण सर्व ही स्पर्धा ओळखतो. याच रणजीत सिंग यांनी २२ ऑगस्ट १८९६ या दिवशी क्रिकेटच्या मैदानावर एक आगळावेगळा पराक्रम केला होता.
२२ जुलै १८९६ मध्ये इंग्लड संघासाठी पदार्पण करताना १५४ धावांची खेळी केली होती. त्यानंतर, बरोबर एक महिन्यानंतर ससेक्ससाठी खेळताना त्यांनी, यॉर्कशायर विरुद्ध एकाच दिवशी दोन शतके लगावली होती. ससेक्सच्या पहिल्या डावात १०० आणि दुसऱ्या डावात नाबाद १२५ धावांचे योगदान त्यांनी दिले.
ससेक्स व यॉर्कशायर यांच्या दरम्यान, तीनदिवसीय प्रथमश्रेणी सामना होव येथे होत होता. यॉर्कशायरने स्टॅन्ली जॅक्सन व बॉबी पिल यांच्या शतकांच्या सहाय्याने आपल्या पहिल्या डावात ४०७ धावा केल्या. प्रत्युत्तरात, तिसर्या दिवशी रणजितसिंग जींनी शतक झळकावून देखील ही ससेक्सचा संघ १९१ धावांवर सर्वबाद झाला. याच खेळीदरम्यान रणजीत सिंगजी यांनी आपल्या प्रथमश्रेणी कारकिर्दीतील ५,००० धावा पूर्ण केल्या. मात्र, ससेक्सला फॉलोऑन मिळाला होता. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना रणजीतसिंग जींनी नाबाद १२५ धावा ठोकल्या. रणजीतसिंग जींच्या शतकी खेळीमुळे २६०-२ धावसंख्या उभारता ससेक्सने सामना वाचवला.
या दोन शतकांसह, ते एका सामन्यात दोन शतके ठोकणारे ससेक्सचे तिसरे फलंदाज ठरले होते. पण, त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये एकाच दिवशी दोन शतके ठोकणारे पहिले व एकमेव क्रिकेटपटू ठरले.
त्यावर्षीच्या, काउंटी हंगामात सर्वाधिक धावा रणजीत सिंगजी यांचे नावे होत्या. संपूर्ण स्पर्धेत ५८.५५ च्या सरासरीने त्यांनी १,६९८ धावा काढल्या. यात ६ शतकांचा समावेश होता. रणजीत सिंगजी त्यांच्या नावे संपूर्ण प्रथमश्रेणी कारकिर्दीत २,७८० धावा ५७.९१ च्या सरासरीने जमा आहेत. यादरम्यान त्यांनी १० शतके देखील झळकावली आहेत.
रणजितसिंह जींनंतर कोणत्याही फलंदाजाने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये असा पराक्रम केला नाही. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून खेळताना मॅथ्यू इलियटने ३१ डिसेंबर १९९५ रोजी पहिल्या डावात १०४ धावा आणि त्यानंतर दुसऱ्या डावात १३५ धावा केल्या होत्या. मात्र त्यावेळी, पहिल्या डावात इलियट आदल्या दिवशी ९८ धावांवर नाबाद होता. या कारणास्तव, इलियटच्या शतकाची तुलना रणजितसिंग जींशी करता येणार नाही.
पण, टी२० क्रिकेटमध्ये असा पराक्रम झाला आहे. स्पॅनिश फलंदाज तारिक अली अवानने ४ सप्टेंबर २०१२ रोजी युरोपियन टी२० चँपियनशिप विभाग-२ मध्ये नाबाद १५० आणि १४८ धावा केल्या होत्या. त्यादिवशी तारिकने एस्टोनियाविरुद्ध ६६ चेंडूंत नाबाद १५० आणि पोर्तुगालविरुद्धच्या सामन्यात १४८ धावा केल्या. मात्र, यानंतरही उपांत्य फेरीत स्वीडनच्या संघाविरूद्ध पराभूत झाल्याने स्पेन अंतिम सामन्यात प्रवेश करू शकला नाही.