जगभरात आज(९ मे) मातृदिन साजरा केला जात आहे. दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा करण्यात येत असतो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आई खास असते. प्रत्येकासाठी तिच्याबद्दलच्या अनेक आठवणी कायम ताज्या असतात. त्याचमुळे मातृदिनाचे औचित्य साधत अनेक जण आईबरोबरच्या आठवणी शेअर करत असतात. भारतीय क्रिकेट संघाबाबतही अशी एक खास आठवण आहे.
साधारण, ५ वर्षांपूर्वी २९ ऑक्टोबर २०१६ रोजी भारत आणि न्यूझीलंड संघात वनडे मालिकेतील शेवटचा सामना झाला होता. हा सामना क्रिकेट इतिहासातील महत्त्वाचा सामना ठरला होता. तसेच खेळाडू आणि आई यांच्यातील गोड नाते दाखवणारा सामना म्हणून याकडे नेहमीच पाहिले गेले.
विशाखापट्टणम येथे झालेला हा सामना क्रिकेट इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला गेला; कारण या सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूंनी त्यांच्या जर्सीवर स्वत:चे किंवा आडनाव लिहिण्याऐवजी त्यांच्या आईचे नाव लिहिले होते. त्यावेळी केवळ क्रिकेटमध्येच नाही तर खेळांच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झाले होते की खेळाडूंनी त्यांच्या जर्सीवर त्यांच्या आईचे नाव लिहिले होते.
भारतीय संघाच्या या कृतीबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक झाले होते. स्टार इंडियाच्या ‘नयी सोच’ या उपक्रमाअंतर्गत भारतीय संघाने असे केले होते.
#TeamIndia sporting their mothers' names on the jersey in the 5th and final ODI #INDvNZ pic.twitter.com/pWcMAKMchB
— BCCI (@BCCI) October 29, 2016
असा झाला होता सामना –
या सामना ५ वनडे मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना होता. या सामन्यापूर्वी २-२ अशी मालिकेत बरोबरी झाली होती. शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली होती. त्यावेळी भारताने ५० षटकात ६ बाद २६९ धावा केल्या होत्या. भारताकडून रोहित शर्मा आणि विराट कोहलीने अर्धशतके झळकावली होती. रोहितने ७० धावांची तर विराटने ६५ धावांची खेळी केली होती. तसेच धोनीने ४१ धावांची खेळी केली होती. न्यूझीलंडकडून इश सोधी आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या होत्या.
प्रतिउत्तरादाखल, २७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव २३.१ षटकात केवळ ७९ धावांवर संपुष्टात आला होता. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विलियम्सनने सर्वाधिक २७ धावा केल्या होत्या. तर टॉम लेथम आणि रॉस टेलरने प्रत्येकी १९ धावांची खेळी केली होती. या तिघांशिवाय कोणालाही दोन आकडी धावसंख्या पार करता आली नव्हती.
भारताकडून अमित मिश्राने अफलातून गोलंदाजी प्रदर्शन केले होते. त्याने ६ षटकात १८ धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच अक्षर पटेलने २ विकेट्स, तर जसप्रीत बुमराह, जयंत यादव आणि उमेश यादवने प्रत्येकी १ विकेट घेतली होती.
हा सामना भारताने १९० धावांनी जिंकून मालिकेत ३-२ अशा फरकाने विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
इरफानवर आपल्या सुनेसोबत अवैध संबंध ठेवल्याचा गंभीर आरोप करणाऱ्या वृद्ध दांपत्याची माघार, म्हणाले…