अनेकदा बीपी वाढवणाऱ्या अन् शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारे सामने महिला क्रिकेटमध्ये कुठे होतात? असा प्रश्न पडणाऱ्यांना याचवर्षी महिला विश्वचषकात झालेली भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना दाखवायचा. मैदानात भिडणार्या या दोन टीम आणि तिकडं हॉटेलमध्ये बसून टीव्ही समोरून न हटलेली वेस्ट इंडीज टीम. साखळी फेरीच्या शेवटच्या चेंडूवर दोन संघांच भवितव्य आणि सेमीफायनल गाठणारा चौथा संघ मिळणार होता. अखेर दीप्ती शर्माने चेंडू टाकला आणि मिग्नन डू प्रीझने एक रन काढत भारतीय टीमला विश्वचषकाबाहेर फेकले. तिकडे वेस्ट इंडीज सेमी फायनलला पोहोचली आणि खेळाडूंनी हॉटेल रूममध्ये धिंगाणा घातला.
साऱ्या बॅटर्सने मिळून उभारलेल्या पावणे तीनशे धावाही भारतीय संघाला सेमीफायनलसाठी कमी पडल्या. क्षेत्ररक्षणात भारतीय खेळाडूंनी कच खाल्ली होती हे देखील सत्य. पण अगदी हातात आलेला सामना गेला तो केवळ एका नो बॉलमुळे. दोन चेंडूंवर तीन धावा दक्षिण आफ्रिके जिंकायला हव्या होत्या. भारतीय टीम सामन्यातून जवळपास बाहेर गेलेली. कारण स्ट्राइकला होती अर्धशतक करून खेळत असलेली मिग्नन डू प्रीझ. दीप्ती शर्माने चेंडू टाकला आणि डू प्रीझने धोनी स्टाइल सिक्स मारून मॅच जिंकवायची असं ठरवलं. चेंडू हवेत उडाला आणि लॉंग ऑनला हरमनप्रीतने झेल घेतला. भारतीय महिलांच्या आनंदाला पारावर उरला नाही. आपण सेमीफायनलला पोहोचलोच असा जल्लोष झाला. इतक्यात अंपायरने साऱ्या आनंदावर विरजण टाकले. हा बॉल नो बॉल होता. हातातोंडाशी आलेला विजय हिरावला गेला. पाच वर्षापूर्वी अपुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेलेला भारतीय संघ रिकाम्या हाताने परतत होता.
नजीकच्या काळात, म्हणजे मागच्या सहा वर्षापासून हा नो बॉल भारतीय क्रिकेटसाठी शापच ठरतोय. या सहा वर्षात तीन अशा घटना होऊन गेल्या. ज्यामुळे भारतीय संघाचा आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळ लांबत गेला.
२०१६ ला टी२० विश्वचषक आपल्याच मातीत होत होता. धोनीची टीम इंडिया रडतखडत सेमीफायनलपर्यंत पोहोचलेली. सेमीफायनल होती वेस्ट इंडिजविरुद्ध, तीही आपल्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर. भारताने पहिली फलंदाजी केली आणि चोपल्या १९२ धावा विराटच्या नाबाद ८९ धावा होत्या. तसं पाहायला गेलं तर ही चांगली धावसंख्या होती. गेल-सॅम्युएल्स जोडी २० धावांत पव्हेलियनमध्ये बसली. पण हार मानतील ते वेस्ट इंडिज कुठले. सिमन्स-चार्ल्स जोडीने भागीदारी केली. सातव्या षटकासाठी भारताचा हुकमी एक्का आर अश्विन गोलंदाजीला आला. अश्विन आला म्हणजे विकेट येणार, हे समीकरण तेव्हा ठरलेलं असायचं. षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने १८ धावांवर खेळत असलेल्या सिमन्सला गंडवले आणि बुमराहने झेल टिपला. खेळाडू जल्लोष करणार इतक्यात अंपायरचा आवाज आला ‘नो बॉल’.
सिमन्स-चार्ल्सने भारतीय गोलंदाजांचा घाम काढला. दोघांनीही अर्धशतके केली. पार्टटायमर विराटने चार्ल्सला बाद केले. पुढच्या षटकात आला हार्दिक पंड्या. सिमन्सचे नुकतीच अर्धशतक पूर्ण झालेले. सिमन्स कव्हर्समधून गॅप काढायला गेला आणि सरळ अश्विनच्या हातात झेल गेला. ते पाहून हार्दिक सुसाट पळत सुटला. पण पुन्हा एकदा अंपायरचा कॉल नो बॉल… जी चूक अश्विनने सातव्या षटकात केली, तिच चूक हार्दिकने केलेली, रेष ओलांडत नो बॉल टाकण्याची. सिमन्स इतकाही बेकार नव्हता की, दोन-दोन जीवदान मिळाल्यावर सामना संपवणार नाही. रसेलला जोडीला घेत त्याने शेवटपर्यंत नाबाग राहत भारताला सरळ विश्वचषकामधूनच बाहेरचा रस्ता दाखवला.
टी२० विश्वचषकाच्या नो बॉलने दिलेली जखम अजून भरली नव्हती इतक्यात, २०१७ मध्ये या जखमेवर मीठ चोळले गेले. स्पर्धा होती आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची. एका दशकाच्या प्रतीक्षेनंतर भारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी आयसीसी ट्रॉफीच्या फायनलमध्ये भिडणार होते. भारताला आपले विजेतेपद राखण्याची नामी संधी होती. ओव्हलच्या ऐतिहासिक ग्राउंडवर पाकिस्तान पहिली फलंदाजी करत होता. फखर झमान आणि अझर अली सेट होणार इतक्यात तिसऱ्याच षटकामध्ये बुमराहने टाकलेला चेंडू झमानच्या बॅटची कड घेऊन यष्टीरक्षक एमएस धोनीच्या हातात विसावला. भारतीय संघ जल्लोष करायला गोळा होणार इतक्यात अंपायर मरे इरॅस्मस यांनी नो बॉलची घोषणा केली. इथेच कोहली अँड कंपनीचे खांदे पडले. त्याच झमानने पुढे १०६ बॉलवर ११४ धावांचा पाऊस पाडत संघाला ३३८ अशी हिमालयाएवढी धावसंख्या रचून दिली. पुढे भारतीय संघ पराभूत झाला आणि पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का म्हणतात? हे या नो बॉलमूळे समजून येते. हे नोबॉल पडले नसते, तर कदाचित बीसीसीआयच्या कॅबिनेटमध्ये आणखी तीन आयसीसी ट्रॉफी दिसल्या असत्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! भारताची सुवर्ण इतिहासाला गवसणी, ७३ वर्षांत पहिल्यांदाच जिंकला ‘थॉमस कप’