---Advertisement---

२० वर्षांपुर्वी जेव्हा गोलंदाज झहिर खानने फलंदाजी करताना केली होती धुव्वादार कामिगिरी

On: मंगळवार, जून 23, 2020 5:06 PM
---Advertisement---

भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहिर खानने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत गोलंदाजी करताना अनेकदा भारताच्या विजयांमध्ये मोलाचा वाटा उचलला आहे. त्याच्या नावावर काही विक्रमही आहेत. पण २००० साली झहिरने गोलंदाजीत नाही तर फलंदाजीत मोठा कारनामा केला होता. तसे पाहिले तर २००० हे वर्ष झहिरसाठी अनेक कारणांसाठी खास ठरलं. याच वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

ऑक्टोबर २००० मध्ये वनडे पदार्पणानंतर झहिर त्याचवर्षी डिसेंबरमध्ये झिम्बाव्वे विरुद्ध भारतीय संघासह वनडे मालिका खेळत होता. याच मालिकेतील एका सामन्यात झहिरने ५० व्या षटकात ४ षटकार मारण्याचा कारनामा केला होता.

जर २००० च्या दशकातील सुरुवातीच्या वर्षांचा विचार केला तर चांगल्या संघांमध्ये झिम्बाब्वेचा देखील समावेश होता. कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता त्यावेळच्या झिम्बाब्वे संघात होती. त्या संघाशी भारताची ५ सामन्यांची वनडे मालिका होत होती. या मालिकेतील पहिले दोन सामने भारताने जिंकले होते. त्यामुळे भारताने २-० अशी आघाडी घेतली होती.

८ डिसेंबरला झिम्बाब्वे विरुद्ध जोधपूर येथे तिसरा वनडे सामना होता. त्या सामन्यात सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली. मात्र गांगुली ५ धावा करुन बाद झाला. त्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने राहुल द्रविडला साथीला घेत भारताचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण ११४ धावांची भागीदारी झाल्यानंतर द्रविड ३० धावांवर बाद झाला.

त्याच्यापाठोपाठ भारताच्या युवराज सिंग, हेमांग बदानी, रतिंदर सोधी या फलंदाजांनीही विकेट्स लगेचच विकेट्स गमावल्या. अखेर सुनील जोशींनी सचिनला थोडीफार साथ दिली पण ते देखील २५ धावांवर बाद झाले. तोपर्यंत सचिनने तशी एकाकी झुंज देताना १४६ धावांची खेळी केली होती.

त्यावेळी झिम्बाब्वेच्या हेन्री ओलोंगाची सचिनने चांगलीच धूलाई केली होती. त्यामुळे भारताने २०० धावांचा टप्पा ओलांडला होता. पण सचिन ४७ व्या षटकात बाद झाला. त्यावेळी झहीर फलंदाजीसाठी आला. त्याने आणि अजित आगरकरने ४९ षटकापर्यंत भारताला २५० धावांच्या वर पोहचवलं.

आता सचिन बाद झालाय म्हटल्यावर पुन्हा ओलोंगा शेवटचे षटक टाकण्यासाठी आला. पहिल्या दोन चेंडूवर झहीर आणि आगरकरने प्रत्येकी एकेरी धाव घेतली. त्याच्यानंतर झहीरने ओलोंगाच्या पुढच्या तीन चेंडूंवर तब्बल ३ षटकार मारले.

झहिरच्या या ३ षटकारांमुळे ओलोंगा दबावात आला. आधीच त्याच्या गोलंदाजीवर बऱ्याच धावा निघाल्या होत्या. पण या दबावात त्याने शेवटचा चेंडू वाईड टाकला. त्यामुळे आणखी एक चेंडू झहीरला खेळण्यासाठी मिळाला. या चेंडूवरही झहीरने खणखणीत षटकार खेचला.

भारताचा डाव ज्यावेळी २५० धावांवर उरकेल असे वाटले होते, तिथे झहीरच्या या आक्रमणामुळे भारताने त्याकाळी डोगंराएवढी वाटणारी २८३ अशी धावसंख्या उभारली. त्यावेळी झहिरने ११ चेंडूत नाबाद ३२ धावा केल्या होत्या. तर ओलोंगाने त्या सामन्यात ४ षटके गोलंदाजी करताना तब्बल ५२ धावा दिल्या होत्या.

https://twitter.com/DreAwara/status/1271316241429327872

पण एवढे होऊनही झिम्बाब्वेकडून अँडी आणि ग्रँड या फ्लॉवर बंधूनी शानदार झुंज दिली. त्या दोघांनीही अर्धशतके झळकावली. अँडीने ७७ आणि ग्रँडने ७० धावांची खेळी केली. त्याला झिम्बाब्वेच्या अन्य फलंदाजांनी छोटेखानी खेळी करत चांगली साथ दिली. तरीही शेवटच्या षटकात भारताने २ विकेट्स घेत पुनरागमन करण्याचा प्रयन्त केला होता. पण अखेर १ विकेट राखत झिम्बाब्वेने २८४ धावांचे आव्हान पूर्ण केले आणि हा सामना जिंकला.

त्या सामन्यात ग्रँड फ्लॉवरला त्यानी घेतलेल्या ३ विकेट्समुळे आणि ७० धावांच्या खेळीमुळे सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

पण या सामन्यात भारताने पराभव स्विकारला असला तरी त्यावेळी झहीरमधील फलंदाजीचे कौशल्य पहिल्यांदा सर्वांना पहायला मिळाले होते. तसेच हा सामना नेहमीच झहिरच्या ४ षटकारांमुळे सर्वांच्याच लक्षात राहिला.

वाचनीय लेख –

जेव्हा नेपाळच्या गोलंदाजाने एका वनडे सामन्यात १० विकेट्स घेत रचला होता इतिहास

रोहित शर्माने असे वाजवले तेराचे बारा, म्हणून झाला हिटमॅन

किस्से क्रिकेटचे २- २६/११ झाले नसते तर श्रीलंकेऐवजी सचिन, द्रविड व धोनीवर झाला असता हल्ला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---