आजपासून युएईमध्ये आयपीएलच्या १३ व्या हंगामाला सुरुवात होत आहे. या आयपीएल हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात अबुधाबी मध्ये होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होईल.
मुंबई इंडियन्स गतविजेता तर चेन्नई सुपर किंग्ज गेल्यावर्षीचा उपविजेता संघ आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केवळ तिसऱ्यांदा आयपीएल भारताबाहेर होत आहे.
विशेष म्हणजे यावेळी सातव्यांदा मुंबई संघ आयपीएल हंगामातील पहिला सामना खेळणार आहे. याआधी त्यांनी २००९,२०१२,२०१४,२०१५,२०१६ आणि २०१८ या सहा हंगामात पहिला सामना खेळला होता. यातील २००९ मध्ये ते गुणतालिकेत सातव्या, २०१२ ला तिसऱ्या, २०१४ ला चौथ्या स्थानावर राहिले होते. तर २०१५ ला त्यांनी विजेतेपद मिळवले होते. याबरोबरच २०१६ आणि २०१८ मध्ये ते ५ व्या क्रमांकावर राहिले.
आता पुन्हा एकदा मुंबईचा संघ यावेळी आयपीएल हंगामातील पहिला सामना खेळणार आहे. पण त्यांचा याआधीचा हंगामातील पहिला सामना खेळण्याचा इतिहास पहाता तो काही खास राहिलेला नाही. त्यांना केवळ एकदाच विजेतेपद मिळवता आले आहे. त्यामुळे आता या हंगामात ते कशी कामगिरी करणार हे पहावे लागेल.
जेव्हाही मुंबई इंडियन्स आयपीएल हंगामातील पहिला सामना खेळला तेव्हा असा होता निकाल –
२००९ – सातवा क्रमांक
२०१२ – तिसरा क्रमांक
२०१४ – चौथा क्रमांक
२०१५ – विजेते
२०१६ – पाचवा क्रमांक
२०१८ – पाचवा क्रमांक
२०२० – ??






