जिथं ऑलिंपिक्स नाही टिकलं तिथं आयपीएलचं काय घेऊन बसलाय

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभर पसरला आहे. त्याचबरोबर तो आता भारतातही वेगाने वाढत आहे. या व्हायरसला नष्ट करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (२४ मार्च) देशात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्याची घोषणा केली होती.

लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता भारतातील सर्वात मोठी टी२० लीग आयपीएल रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीसीसीआय सध्या दबावात आहे.

पंतप्रधान मोदींच्या (Narendra Modi) देशात लॉकडाऊनच्या घोषणेपूर्वीच बीसीसीआयने १५ एप्रिलपर्यंत आयपीएल स्थगित केले होते. त्यावेळी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) म्हणाला होता की, आयपीएलचे आयोजन केवळ कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर करण्यात येईल.

पीटीआयशी बोलताना गांगुली म्हणाला की, “मी सध्या याबद्दल काहीही सांगू शकत नाही. आम्ही  सध्या आयपीएल स्थगित केल्यानंतर ज्या स्थितीत होतो त्याच स्थितीत आहोत. मागील १० दिवसांमध्ये काहीही बदल झालेला नाही. त्यामुळे माझ्याकडे आयपीएलच्या आयोजनावर कोणतेही उत्तर नाही.”

परंतु किंग्स इलेव्हन पंजाबचे सहमालक नेस वाडियाने (Ness Wadia) यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली. “बीसीसीआयने वास्तविकरित्या आयपीएल स्थगित करण्याचा विचार केला पाहिजे. आयपीएलचा विचार केला तर आपल्याला मोठ्या जबाबदारीने काम करण्याची आवश्यकता आहे,” असे पीटीआयशी बोलताना वाडिया म्हणाला.

“मला असं वाटतं आणि अपेक्षा आहे की, मे पर्यंत परिस्थितीत सुधारणा होईल. परंतु परदेशातील खेळाडूंना देशात प्रवेश करण्याची परवानगी मिळेल का?” असे आपले मत मांडत वाडियाने प्रश्न उपस्थित केला.

यापूर्वी बीसीसीआयने (BCCI) मंगळवारी आयपीएल फ्रंचायझी मालकांसोबत होणारी बैठकही रद्द केली होती.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “जर ऑलिंपिक (Olympic) स्पर्धा एका वर्षासाठी रद्द केल्या जाऊ शकतात, तर त्या तुलनेत आयपीएल खूप लहान स्पर्धा आहे. हे सर्व ठीक करणे कठीण होत आहे. यावेळी सरकार परदेशाचा व्हिसा देण्याचा विचारही करत नाही.”

“२१ दिवसांच्या लॉकडाऊनबरोबरच १४ एप्रिलपर्यंत गोष्टी सामान्य होण्याची शक्यता कमी आहे. परंतु यावेळी अनेक अटी असतील. त्यामुळे आयपीएल रद्द न करणे हा मूर्खपणा असले,” असेही यावेळी बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.

ट्रेंडिंग घडामोडी-

-टाॅप ५- कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले महारथी

-टॉप ५- असे खेळाडू ज्यांनी लावला होता मॅन ऑफ द सिरीजचा रतीब

-अशी आलीय की २४ शतकं केलेला हा खेळाडूही करतोय टाॅयलेट साफ

You might also like