भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. न्यूझीलंडनं मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून 2-0 अशी अजेय आघाडी घेतली. या पराभवामुळे भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. आता तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी चाहत्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहे की, जर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळू शकली नाही, तर कोणते दोन संघ अंतिम फेरीत प्रवेश करतील? चला तर मग, या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला याबद्दल सांगतो.
ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 सायकलच्या अंतिम फेरीसाठी सर्वात मोठा दावेदार आहे. कांगारू संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. या सायकलमध्ये त्यांनी आतापर्यंत 12 सामने खेळले, ज्यापैकी 8 जिंकले, 3 हरले आणि 1 अनिर्णित राहिला. सध्या ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी 62.50 आहे, जी टीम इंडियापेक्षा थोडीच कमी आहे. टीम इंडियाची सध्याची विजयाची टक्केवारी 62.82 आहे. टीम इंडिया शर्यतीतून बाहेर पडल्यास ऑस्ट्रेलिया आपल्या उत्कृष्ट विजयाच्या टक्केवारीमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याची प्रबळ दावेदार असेल.
जर टीम इंडिया पात्र ठरली नाही, तर ऑस्ट्रेलियासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील दुसरा संघ श्रीलंका किंवा न्यूझीलंड असू शकतो. सध्या गुणतालिकेत श्रीलंका तिसऱ्या तर न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आहे. या सायकलमध्ये श्रीलंकेनं आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले, ज्यापैकी त्यांनी 5 जिंकले, 4 गमावले आणि 1 अनिर्णित राहिला. श्रीलंकेची विजयाची टक्केवारी 55.56 आहे. याशिवाय न्यूझीलंडनं आतापर्यंत 10 सामने खेळले, ज्यापैकी त्यांनी 5 जिंकले आणि 5 गमावले. किवी संघाची विजयाची टक्केवारी 50 आहे.
हेही वाचा –
इमर्जिंग आशिया कपला मिळाला नवा चॅम्पियन, फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव
‘भारताला चेतेश्वर पुजाराची उणीव भासेल’, ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी माजी मुख्य निवडकर्त्याचे विधान
IND vs NZ; वानखेडे मैदानावर रविचंद्रन अश्विन रचणार इतिहास!