इंग्लंडचा दिग्गद क्रिकेटपटू जो रुटने शुक्रवारी (१५ एप्रिल) एक मोठा निर्णय घेत सर्वांनाच धक्का दिला. त्याने इंग्लंडच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोडले आहे. तो गेले पाच वर्षे इंग्लंडच्या कसोटी संघाने नियमितपणे नेतृत्व सांभाळत होता. इतकेच नाही, तर त्याने २०१७ पासून इंग्लंडचे कसोटीत नेतृत्व करताना सर्वाधिक २७ कसोटी सामनेही जिंकले होते. तो इंग्लंडचा कसोटीत सर्वाधिक धावा आणि शतके करणारा कर्णधारही ठरला. मात्र, गेल्या काही महिन्यांत आलेल्या अपयशानंतर त्याच्या नेतृत्वावर टिका होत होती. अखेर त्यानेच कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला.
रुटने (Joe Root) कर्णधारपद (Test Captaincy) सोडले असले, तरी आता त्याच्यानंतर इंग्लंडचा नवा कर्णधार कोण होणार याबद्दल चर्चा सुरु झाल्या आहेत. आपण या लेखात अशाच ४ खेळाडूंबद्दल जाणून घेऊ, जे जो रुटची कर्णधार म्हणून जागा घेऊ शकतात.
१. बेन स्टोक्स – जो रुटनंतर इंग्लंडच्या कसोटी कर्णधारपद सांभाळण्याच्या शर्यतीत सध्या सर्वात पुढे बेन स्टोक्सचे (Ben Stokes) नाव आहे. स्टोक्स गेल्या अनेक वर्षांपासून इंग्लंडचा महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे. तसेच त्याने इंग्लंडकडून शानदार प्रदर्शनही केले आहे. तसेच त्याने जो रुटच्या अनुपस्थितीत २०२० मध्ये एका कसोटी सामन्यात इंग्लंडचे नेतृत्वही केले होते. ज्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. पण असे असले तरी त्याचा अनुभव पाहाता त्याला कर्णधारपद सोपवले जाऊ शकतो.
२. स्टुअर्ट ब्रॉड – इंग्लंडच्या सर्वात अनुभवी गोलंदाजांपैकी एक असलेल्या स्टुअर्ट ब्रॉडकडेही (Stuart Broad) इंग्लंडच्या कसोटी कर्णधापदासाठी एक पर्याय म्हणून पाहिले जात आहे. त्याने १५२ कसोटी सामने खेळले आहेत. त्यामुळे त्याच्याकडे मोठा अनुभव देखील आहे. त्यामुळे तो रुटचा कर्णधार म्हणून वारसदार ठरू शकतो.
३. जॉनी बेअरस्टो – इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) हा देखील इंग्लंडचे कसोटी कर्णधारपद सांभाळू शकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आहे. तो देखील गेल्या अनेक वर्षांपासून इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्त्व करत असून चांगल्या फॉर्ममध्ये देखील आहे. त्याचबरोबर तो यष्टीरक्षक असल्याने त्याला कर्णधारपदासाठी पसंती मिळू शकते. क्रिकेटमध्ये असे म्हणले जाते, की यष्टीरक्षक मैदानाच्या चौफेर लक्ष ठेवू शकत असल्याने तो चांगला कर्णधार बनू शकतो. बेअरस्टोने इंग्लंडकडून ८३ कसोटी सामने खेळले आहेत.
४. जॅक क्रॉवली – इंग्लंडचा २४ वर्षीय क्रिकेटपटू जॅक क्रावलीचा (Zak Crawley) देखील इंग्लंडचा कसोटी कर्णधारपदासाठी चांगला पर्याय आहे. इंग्लंड क्रिकेटला जर भविष्यातील विचार करता युवा खेळाडूकडे कर्णधारपद द्यायचे असल्यास जॅक क्रावलीचा विचार होऊ शकतो. तो सध्या केवळ २४ वर्षांचा आहे. त्यामुळे ही जमेची बाजू आहे. त्याने आत्तापर्यंत २१ कसोटी सामने खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
एकच तर हृदय आहे, कितीदा जिंकशील! चौकार मारल्यानंतर हार्दिकने गोलंदाज प्रसिद्धची मागितली क्षमा
“विराट-धोनीबद्दल सर्वजण चर्चा करतात, पण बुमराहनेही भारतासाठी अप्रतिम कामगिरी केली आहे”