अफगाणिस्तानविरुद्धच्या टेस्ट आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झाली आणि सगळीकडे गुरनूर ब्रार या नावाची चर्चा सुरू झाली. निवडसमितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी गुरनूर भारतीय संघाचं भविष्य असू शकतो असं सांगितलं.
डेल स्टेन, शोएब अख्तर आणि ब्रेट ली यांची अॅक्शन फॉलो करत गोलंदाजी करणं गुरनूरला आवडत असे. १६व्या वर्षी गुरनूरने चारदिवसीय सामने खेळायला सुरुवात केली. ‘मी डेल स्टेनचा चाहता आहे. त्याच्यामुळेच मी गोलंदाजी करू लागलो. त्याने दशकभराहून जास्त काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलं. वेगाच्या बरोबरीने अचूकता हे त्याच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य होतं. त्यामुळेच तो जगभरात नंबर एकचा गोलंदाज होऊ शकला’, असं ब्रारने ‘टाईम्सऑफइंडिया डॉटकॉम’शी बोलताना सांगितलं.
टीम इंडियात निवड झाली असली तरी गुरनूरची पहिली आवड फुटबॉल आणि टेनिस होतं. मित्र म्हणाला म्हणून गुरनूरने शाळेत ट्रायल्स दिल्या आणि त्याची निवड झाली. सहा फूट पाच इंच या उंचीचाही गुरनूरला फायदा झाला. वयोगट स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर गुरनूरची शुबमन गिलशी भेट झाली. गुरनूरच्या वेगाने गिलला प्रभावित केलं. ‘U19च्या दिवसांपासून मी त्याला गोलंदाजी करतो आहे. तो भारतासाठी U19 सामने खेळत असताना कटोच शिल्डचे सामने खेळायला आला होता. त्याने माझी गोलंदाजी पाहिली आणि जिल्हा संघात निवड यासाठी प्रयत्न केले. मी मोहाली संघासाठी खेळत असे. माझी पंजाबच्या U23 संघासाठी निवड झाली’, असं गुरनूरने सांगितलं.
गुरनूरने २०२१ मध्ये पंजाबसाठी लिस्ट ए सामन्यात पदार्पण केलं. तो पाच सामने खेळला. फार विकेट्स मिळाल्या नाहीत पण पंजाब किंग्ज संघाच्या टॅलेंट स्काऊट्सनी त्याला हेरलं. त्यांच्यासाठी नेट बॉलर झाला. त्यावेळी शिखर धवन पंजाब किंग्जचा कर्णधार होता. ‘तू संघाबरोबर राहा असं त्यांनी मला सांगितलं. मी नेट बॉलर म्हणून होतो. राजा बावा दुखापतग्रस्त झाल्यानंतर मला संघात घेण्यात आलं’.
त्याच हंगामात गुरनूरने लखनौ सुपरजायंट्स संघाविरुद्ध आयपीएल पदार्पण केलं. ‘अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, सॅम करन असे मोठे खेळाडू संघात असतानाही कर्णधार शिखरने नवा चेंडू माझ्या हाती सोपवला. त्याने माझा आत्मविश्वास उंचावला. पहिल्याच षटकात के.एल.राहुलने एक झेल सोडला. मी त्या षटकात फक्त २ धावा दिल्या. दुसऱ्या षटकात मात्र माझ्या गोलंदाजीवर दोन षटकार चोपण्यात आले. या स्तरावर तुमच्या वेगाला कुणी घाबरत नाही. वेगाच्या बरोबरीने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करायला हवी हे लक्षात आलं’, असं गुरनूरने सांगितलं.
‘आयपीएल संपल्यानंतर मी शेर ए पंजाब लीगमध्ये खेळलो. या स्पर्धेत खेळताना मी दुखापतग्रस्त झालो. दुखापत गंभीर असल्याने २०२३-२४ हंगामात मी खेळू शकलो नाही. वर्कलोड मॅनेजमेंट, फिटनेस याविषयी मी गंभीर नव्हतो. पण दुखापतीनंतर मला त्याचं महत्त्व लक्षात आलं’, असं गुरनूरने सांगितलं. पंजाबमधल्या श्री मुक्तसार साहिब जिल्ह्यातील खेओ वाली हे गुरनूरचं गाव. दुखापतीमुळे हंगामात खेळता आलं नाही आणि आयपीएल कंत्राटही नव्हतं. जुना मित्र शुबमन गिलची साथ मिळाली. ‘शुबमनने काय करतो आहेस विचारलं. गुजरात टायटन्स संघात नेट बॉलर म्हणून ये असं सांगितलं. इथे खूप शिकायला मिळेल असं तो म्हणाला. ते खरं ठरलं. शुबमन नेहमी संघातल्या सहकाऱ्यांचा विचार करतो’.
गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक आशिष नेहरा यांच्या रुपात गुरनूरला उत्तम मार्गदर्शक लाभला. नेहरा यांनी कारकिर्दीत असंख्य दुखापतींचा सामना केला आणि यशस्वी पुनरागमनही केलं. ‘ते मला दुखापतींची काळजी कशी घ्यायची ते सांगतात. मी केलेल्या चुका करू नकोस’ असंही सांगतात. रिकव्हरीसाठी पुरेसा वेळ दे असं ते आवर्जून सांगतात. त्यांच्या मार्गदर्शनाचा मला खूप फायदा होतो आहे असं गुरनूरने सांगितलं. वर्षभर नेट बॉलर म्हणून खेळल्यानंतर गुजरात टायटन्सने गेल्या वर्षी लिलावात त्याला ३० लाख रुपये खर्चून संघात समाविष्ट केलं. यंदा त्याला रिटेनही केलं.
गुजरात संघात दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी गोलंदाज कागिसो रबाडा आहे. ‘रबाडा माझी गोलंदाजी बारकाईने पाहतो. मला वेळोवेळी सल्ले देतो. दुखापती होऊ नयेत यासाठी काय करावं सांगतो’, असं गुरनूरने सांगितलं.
गुरनूर डोमेस्टिक क्रिकेटमध्ये पंजाब संघाकडून खेळतो. आतापर्यंत त्याने पंजाबसाठी १८ सामने खेळले आहेत. भारतीय अ संघाचाही तो भाग होता. भारतीय अ संघाकडून खेळताना ३ सामन्यात त्याने १२ विकेट्स पटकावल्या.





