गेल्या काही दिवसांपासून सर्व भारतीयांचं लक्ष एका महत्त्वाच्या सामन्याकडे लागलं होतं. क्रिकेटवेड्या या देशात क्वचितच दुसऱ्या खेळांकडे एवढं लक्ष दिलं जातं, मात्र हा सामना वेगळा होता!
वास्तविक, जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये भारताचा 18 वर्षीय डी गुकेश विजेतेपदासाठी खेळत होता. त्याच्यासमोर आव्हान होतं चीनच्या गतविजेत्या डिंग लिरेन याचं. या सामन्यात तब्बल 14 फेऱ्या खेळल्या गेल्या. अखेर शेवटच्या फेरीत गुकेशनं विजय मिळवत इतिहासातील सर्वात तरुण जगज्जेता बनण्याचा बहुमान पटकावला!
चेन्नईचा 18 वर्षीय डोम्माराजू गुकेश विश्वनाथन आनंद यांच्यानंतर बुद्धिबळात विश्वविजेता बनणारा केवळ दुसरा भारतीय आहे. 5 वेळच्या विश्वविजेत्या आनंद यांनी 2000 साली आपलं पहिलं विजेतेपद जिंकलं होतं. 2012 मध्ये त्यांनी आपला पाचवा आणि शेवटचा खिताब जिंकला. त्यानंतर आता 12 वर्षांनंतर भारताला गुकेशच्या रुपात दुसरा विश्वविजेता मिळाला आहे.
14 व्या गेममध्ये डिंग लिरेनचा पराभव केल्यानंतर गुकेशच्या डोळ्यात अश्रू आले होते. त्यानं काय केलं हे त्याला माहीत होतं. गुकेश चॅम्पियन बनल्यानंतर त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गुकेशचा हा व्हिडिओ त्यावेळचा आहे जेव्हा तो 12 वर्षांचा होता. त्यावेळी तो ग्रँडमास्टरही बनला नव्हता. व्हिडिओमध्ये चेसबेस इंडियाचा आयएम सागर शाह गुकेशला त्याची इच्छा काय आहे असे विचारताना दिसतो. या प्रश्नाचं उत्तर देताना गुकेश म्हणतो, “मला जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन बनायचं आहे”. सात वर्षांनंतर गुकेशनं त्याचे हे शब्द खरे करून दाखवले!
गतविजेता डिंग लिरेन आणि गुकेश यांच्यातील हा सामना सुमारे तीन आठवडे चालला. 14 फेऱ्यांमध्ये दोघांचीही मानसिक आणि शारीरिक शक्ती पणाला लागली होती. अखेरच्या क्षणांमध्ये हा सामना टायब्रेकरमध्ये जातो की काय, असं वाटत होतं. पण शेवटी गुकेशनं त्याला ‘बुद्धिबळाचा बादशाह’ का म्हटलं जातं हे दाखवून दिलं.
डोम्माराजू गुकेश याचा जन्म 29 मे 2006 रोजी चेन्नई येथे झाला. त्याचे वडील डॉ. रजनीकांत हे कान, नाक आणि घसा सर्जन आहेत, तर आई डॉ. पद्मा मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत. तेलुगू कुटुंबातून आलेल्या गुकेशनं वयाच्या सातव्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला तो आठवड्यातून तीन दिवस एक तास सराव करायचा.
गुकेशनं 2015 मध्ये आशियाई शालेय बुद्धिबळ चॅम्पियनशिपच्या 9 वर्षांखालील गटात पहिलं पारितोषिक जिंकलं. त्यानंतर त्यानं 2018 मध्ये 12 वर्षांखालील गटात जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. 12 व्या वर्षी त्यानं 2018 आशियाई युवा बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये अंडर-12 वैयक्तिक रॅपिड आणि ब्लिट्झ, अंडर-12 टीम रॅपिड आणि ब्लिट्झ आणि अंडर-12 वैयक्तिक क्लासिकल फॉरमॅटमध्ये पाच सुवर्णपदकं जिंकली.
गुकेशचे प्रशिक्षक आणि ग्रँडमास्टर विष्णू प्रसन्ना त्याच्याबद्दल बोलताना म्हणतात की, गुकेशचं आयुष्य लहानपणापासून असंच होतं. तो एका ध्येयानं झपाटलेला होता. हे ध्येय म्हणजे जगज्जेता बनणं! त्याच्या पिढीतील बहुतेक मुलांच्या विपरित गुकेश सोशल मीडिया आणि इंटरनेट फार कमी वापरतो, हे विशेष.
एक खेळाडू म्हणून गुकेश ज्या पद्धतीनं कॅलक्युलेशन करतो, त्यावरून त्याच्या मेंदूत चिप बसवलेली आहे की काय असं वाटतं. तो खेळताना जोखीम घेतो. जणू त्याला माहित आहे की पुढची व्यक्ती काय करणार आहे. खेळताना मात्र त्याचा चेहरा भावनाशून्य असतो. चेहऱ्याच्या हावभावावरून त्याच्या मनात काय चाललं आहे हे कोणीही सहजासहजी ओळखू शकत नाही. यामुळे विरोधी स्पर्धकाला त्याच्याविरुद्ध खेळणं अवघड जातं.
बुद्धिबळ चॅम्पियनशिप 1886 मध्ये सुरू झाली. तेव्हापासून आतापर्यंत 17 खेळाडूंनी ही स्पर्धा जिंकली आहे. गुकेश 18वा विजेता ठरला. या 17 चॅम्पियन्समध्ये बॉबी फिशर, गॅरी कास्परोव्ह, विश्वनाथन आनंद आणि मॅग्नस कार्लसन यांसारख्या महान नावांचा समावेश आहे. मात्र यांपैकी कोणीही जगज्जेता झाला तेव्हा गुकेश एवढा तरुण नव्हता!
आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात गुकेशनं अनेक इतिहास रचले. तो भारताचा सर्वात तरुण ग्रँडमास्टर आहे. त्याचा जगातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर बनण्याचा विक्रम केवळ 17 दिवसांनी चुकला. मार्च 2017 मध्ये 12 वर्षे, 7 महिने आणि 17 दिवस वयाचा गुकेश इतिहासातील तिसरा सर्वात तरुण ग्रँडमास्टर बनला. ऑगस्ट 2023 मध्ये तो 2750 च्या रेटिंगवर पोहोचणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. एका महिन्यानंतर गुकेशनं जागतिक क्रमवारीत भारतीय ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदला मागे टाकलं. विश्वनाथन आनंदला मागे टाकणारा गुकेश हा 36 वर्षांतील पहिला भारतीय आहे!
हेही वाचा –
इतिहास घडला! 18 वर्षीय डी गुकेश बनला बुद्धिबळातील सर्वात तरुण जगज्जेता
आयपीएल 2025 साठी मुंबई इंडियन्सची नवी जर्सी लॉन्च? सोशल मीडियावरील दाव्यामागची कहाणी जाणून घ्या
यष्टिरक्षकाला दिलासा, डोपिंग प्रकरणी लावण्यात आलेली 3 वर्षांची बंदी उठवली