भारतीय संघाची बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना चेन्नईत होणार आहे. बीसीसीआयने या मालिकेच्या तयारीसाठी चेन्नईमध्ये 13 ते 18 सप्टेंबर दरम्यान शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत या मालिकेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना शिबिरात उपस्थित राहावे लागणार आहे. दरम्यान, एक मोठी बातमी समोर येतेय. एका वृत्तानुसार, बोर्डाने हिमांशू सिंग (Himanshu Singh) नावाच्या ऑफ स्पिनरलाही या शिबिरासाठी आमंत्रित केले आहे. या 21 वर्षीय स्पिनरची गोलंदाजी शैली रविचंद्रन अश्विनसारखी आहे. मुंबईच्या या गोलंदाजाने देशांतर्गत क्रिकेट सामन्यात 7 विकेट घेतल्या आहेत.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळणारा हिमांशू सिंग काही काळ बीसीसीआयच्या ‘इमर्जिंग प्लेयर्स’ कॅम्पचा भाग होता. त्याची गोलंदाजी पाहून मुख्य निवडकर्ता अजित आगरकर खूपच प्रभावित झाले आहेत. हिमांशूची उंची आणि ॲक्शन अश्विनसारखी आहे. तसेच चेंडूवर जबरदस्त नियंत्रण आहे. तब्बल 6 फूट 4 इंच उंच हिमांशूने केटी मेमोरियल स्पर्धेमध्ये आंध्र प्रदेशविरुद्ध 74 धावांत 5 बळी घेतले आहेत. याआधी, त्याने 2023-24 हंगामात 23 वर्षांखालील सीके नायडू ट्रॉफीमध्ये 8 सामन्यात 38 बळी घेतले होते. एका डावात 4 वेळा 5 बळी घेण्याचा पराक्रमही केला आहे.
हिमांशू बीसीसीआयच्या प्रशिक्षणासाठी सतत अनंतपूर आणि बेंगळुरू येथे येत आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि प्रशिक्षक हिमांशू सिंगवर सतत लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे तो आगामी काळात लवकरच भारतीय संघाचा भाग होऊ शकतो. याच मालिकेच्या आधी जम्मू काश्मीरचा वेगवान गोलंदाज युद्धवीर चरक याला देखील नेट बॉलर म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची पुढील आठवड्यात निवड होऊ शकते. या मालिकेत दोन सामने खेळले जातील. रोहित शर्मा या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
कोण आहे हा 4 फुट उंचीचा पॅरा ॲथलीट, ज्यानं देशासाठी सुवर्णपदक जिंकलं?
24 वर्ष…एकही पराभव नाही! बांगलादेशविरुद्ध कसोटीमध्ये भारताचा तुफानी रेकॉर्ड; आकडेवारी खूपच धक्कादायक
दुलीप ट्रॉफीमध्ये आरसीबीच्या गोलंदाजाचा कहर, पहिल्याच सामन्यात घेतल्या 9 विकेट