दुबई। आज (18 सप्टेंबर) भारताचा 14 व्या एशिया कपमध्ये हाँग काँगशी पहिला सामना होत आहे. या सामन्यातून खलील अहमद या 20 वर्षीय खेळाडूने भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे.
तो भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा 361 वा आणि वनडेत पदार्पण करणारा 222 वा खेळाडू ठरला आहे.
कोण आहे खलील अहमद-
एशिया कपसाठी सर्वात आश्चर्यकारक निवड खलील अहमद या खेळाडूची होती. केवळ 2 प्रथम श्रेणी सामने, 17 अ दर्जाचे सामने, 12 ट्वेंटी20 आणि 1 आयपीएल सामना खेळलेल्या या खेळाडूला संघात संधी दिली गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
परंतु इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारत अ कडून खेळताना या खेळाडूने 5 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच परवा संपलेल्या चौरंगी मालिकेत त्याने 4 सामन्यात 7 विकेट्स घेतल्या आहेत.
5 डिसेंबर 1997ला राजस्थानमध्ये जन्म झालेल्या या खेळाडूचे वडील हे वाॅचमॅन म्हणुन काम पाहतात. त्यांचा खलील अहमदच्या क्रिकेट खेळण्याला विरोध होता. त्यांनी त्याचे मन वळविण्याचाही प्रयत्न केला परंतु अखेर त्याने आयपीएल, नंतर राजस्थान आणि आता देशाच्या संघात स्थान मिळवले आहे.
आयपीएल 2018च्या हंगामात हैद्राबाद विरुद्ध कोलकाता सामन्यात त्याने 18 चेंडूत 38 धावा दिल्या होत्या. त्यात त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. तब्बल 3 कोटी रुपये देऊन 2018च्या हंगामात त्याला हैद्राबादने आपल्या संघात घेतले होते.
त्याची बेस प्राईज केवळ 20 लाख होती. किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली डेअरडेविल्स त्याला संघात घेण्यासाठी इच्छुक होते.
2016मध्ये या खेळाडूला दिल्ली डेअरडेविल्स संघाने 10 लाख रुपये मोजत संघात घेतले होते परंतु त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
तो डाव्या हाताने मध्यमतगती गोलंदाजी करतो. 2016ला 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात 3 सामन्यात 12 विकेट्स घेतल्या होत्या.
2017-18 मध्ये या खेळाडूने राजस्थान संघाकडून तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.
तसेच विजय हजारे ट्राॅफीमध्ये 6 सामन्यात 10 विकेट्स घेतल्या. तसेच भारत ब कडून कर्नाटक विरुद्ध देवधर ट्राॅफीच्या अंतिम सामन्यात खेळताना त्याने 49 धावा देत 3 विकेट्स घेतल्या होत्या.
खलील अहमदची कारकिर्द थोडक्यात-
अ दर्जाच्या 17 सामन्यांत 28 विकेट्स
प्रथम श्रेणीच्या 2 सामन्यांत 2 विकेट्स
ट्वेंटी२०च्या 12 सामन्यात 17 विकेट्स
आयपीएलच्या एका सामन्यात एकही विकेट नाही
असा आहे हाँग काँग विरुद्धचा 11 जणांचा भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, अंबाती रायडू, केदार जाधव, एमएस धोनी (यष्टीरश्रक), दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, खलील अहमद.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशिया कप २०१८: भारत विरुद्ध हाँग काँग सामन्याबद्दल सर्वकाही
–रोहित शर्मा एशिया कपमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करण्यास उत्सुक