नवी दिल्ली। आयपीएलच्या १३ व्या हंगामातील १५ वा सामना शनिवारी (३ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. हा सामना बेंगलोर संगाने ८ विकेट्सने जिंकला. बेंगलोरचा हा या हंगामातील तिसरा विजय होता.
नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीला उतरलेल्या राजस्थान संघाची वरची फलंदाजी फळी बेंगलोर संघापुढे पुन्हा एकदा फ्लॉप ठरली. परंतु यादरम्यान राजस्थान संघाचा डाव सांभाळला तो युवा फलंदाज महिपाल लोमरोरने. लोमरोरला त्याच्या जबरदस्त फलंदाजीमुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये ज्यूनियर ख्रिस गेल म्हणून ओळखले जाते.
राजस्थानने केली खराब सुरुवात, लोमरोरने सांभाळला डाव
विशेष म्हणजे अबू धाबीच्या मैदानावर खेळताना राजस्थानने आपल्या डावाची सुरुवात विस्फोटक अंदाजात सुरू केली होती. परंतु युवा गोलंदाज नवदीप सैनी, युझवेंद्र चहल आणि इसुरु उदाना यांच्या जोरावर बेंगलोरने राजस्थान संघाची वरची फळी पूर्णपणे उध्वस्त केली. बेंगलोरच्या गोलंदाजीसमोर कर्णधार स्टिव्ह स्मिथही ५ धावा करत बाद झाला, तर जॉस बटलरही २२ धावा करत पव्हेलियनच्या दिशेने मार्गस्थ झाला.
त्यानंतर संघातील धडाकेबाज फलंदाज संजू सॅमसनलाही चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने केवळ ४ धावा केल्या. पावरप्लेच्या आतच राजस्थानने आपल्या ३ महत्त्वपूर्ण विकेट्स गमावल्या. त्यानंतर फलंदाजीला आला महिपाल लोमरोर. लोमरोरने रॉबिन उथप्पासोबत भागीदारी करत राजस्थानचा डाव सांभाळला. चौथ्या विकेटसाठी त्यांनी ३९ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर उथप्पाला चहलने झेलबाद केले.
लोमरोरला अर्धशतक करता आले नाही
त्यानंतर लोमरोरने रियान परागसोबत डाव सावरला आणि ३९ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४७ धावा केल्या. तरीही लोमरोरला आयपीएल इतिहासातील आपले पहिले अर्धशतक ठोकता आले नाही. त्याने चहलला अस्मान दाखवत २ चमकदार षटकार ठोकले. परंतु चहलनेच देवदत्त पडिक्कलच्या हातून लोमरोरला झेलबाद केले.
विशेष म्हणजे लोमरोरचा आयपीएलमधील हा पहिलाच सामना होता. त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात धडाकेबाज कामगिरी करत आपली क्षमता सिद्ध केली. त्याच्या खेळीमुळे संघाची धावसंख्या १५४ धावा इतकी झाली. परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
आजीने केला सांभाळ
लोमरोर राजस्तानकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. राजस्थानच्या नागोरमध्ये जन्मलेल्या लोमरोरला केवळ ११ वर्षांच्या वयामध्ये आपले घर सोडून जयपूरला राहण्यासाठी जावे लागले होते. खरंतर नागोरमध्ये क्रिकेटसाठी चांगल्या सुविधा नसल्यामुळे त्याला जयपूरला शिफ्ट व्हावे लागले. तिथे तो त्याच्या आजीसोबत राहत होता. त्याच्या आजीनेच त्याचा सांभाळ केला होता. तिथे राहून त्याने खूप मेहनत घेतली आणि आपली वेगळी अशी एक ओळख निर्माण केली.
त्याने आतापर्यंत ३३ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३९.०६ च्या सरासरीने १९५३ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने ४ शतके आणि १२ अर्धशतके ठोकली आहेत.