आयपीएल २०२६ च्या हंगामात ४७ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स असा रंगला. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अखेर एमआयने सलग तीन पराभवानंतर विजयाची चव चाखली. हा सामना एमआयने ६ विकेट्सने जिंकला. यामध्ये त्यांचा फिरकीपटू रघु शर्मा याने आपली आयपीएलमधील पहिली विकेट घेतली आणि त्यानंतर त्याने केलेल्या जल्लोषाचे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या स्पर्धेत केवळ दुसरा सामना खेळताना रघुने पदार्पण करणाऱ्या अक्षत रघुवंशीला बाद केले. त्यानंतर त्याचे भावनिक हावभाव आणि एक कागदाचा तुकडा. अक्षतला ११ धावांवर बाद केल्यानंतर रघुने काही आक्रमक नाही तर एका वेगळ्या प्रकारे आनंद व्यक्त केला. त्यानेच अक्षतचा सुंदर झेल घेतला आणि विकेट पडल्यानंतर एक चिठ्ठी वर उचलून धरली, त्यामुळे दिनेश रामदिन आणि अभिषेक शर्माच्या सेलिब्रेशनची आठवण झाली.
रघुने चिठ्ठीमध्ये काय लिहिले होते, हे जाणून घेण्यासाठी एमआयचा प्रभारी कर्णधार सूर्यकुमार यादवही त्याच्याजवळ जात वाचण्याचा प्रयत्न करत होता. तो क्षण लगेचच व्हायरल झाला. त्यामध्ये रघुचा १५ वर्षांचा प्रवास सामावलेला होता. त्यावर लिहिले होते, ‘राधे राधे. गुरूदेवांच्या दिव्य कृपेने, अत्यंत वेदनादायी १५ वर्षे आज संपली. मला ही संधी दिल्याबद्दल मुंबई इंडियन्सचे (ब्लू ऍंड गोल्ड) आभार. मी सदैव ऋणी राहीन. जय श्री राम.’
मागील हंगामात विग्नेश पुथुरच्या दुखापतीमुळे बदली खेळाडू म्हणून रघु एमआयमध्ये सामील झाला. या हंगामासाठीही त्याला कायम ठेवले गेले. सुरुवातीचे काही सामने बेंचवर बसल्यानंतर एमआयने त्याला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध (२ मे) पदार्पणाची संधी दिली. त्यामध्ये त्याने ४ षटकांत एकही विकेट न घेता २४ धावा दिल्या होत्या.
एलएसजीविरुद्ध रघुने स्थिर कामगिरी केली. त्याने ४ षटकांत ३६ धावा देत एक विकेट घेतली. त्याने डावाच्या मधल्या टप्प्यात प्रभावी कामगिरी केली. उत्तम गोलंदाजी करत त्याने विरोधी संघांची धावांची गती कमी केली.
रघुचा क्रिकेटमधील आतापर्यंतचा प्रवास पाहिला तर तो काही सोपा नाही. त्याने वयाच्या १८ वर्षानंतर गंभीर क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. सुरूवातीला वेगवान गोलंदाजी केली, नंतर हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो लेग-स्पिनकडे वळला. याचे श्रेय त्याने दिग्गज शेन वॉर्नला दिले. पुढे त्याचा हा निर्णय कारकिर्द वाढवण्यासाठी आणि एमआयमध्ये स्थान मिळवण्यासाठी महत्त्वाचा ठरला.
रघुने पंजाबच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली सुरूवात केली, मात्र त्याला संघातून वगळण्यात आले. पुदुचेरीला गेल्यानंतरही त्याला खूपच कमी संधी मिळाल्या. आयपीएलच्या आधी त्याने श्रीलंकेत ग्रेड क्रिकेटचा एक हंगाम आणि त्यानंतर इंग्लंडमध्ये क्लब क्रिकेटचा अनुभव घेतला. इंग्लंडमध्ये त्याला इम्रान ताहिरसारख्या खेळाडूंचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीत विविधता आणि नियंत्रण आणून ती सुधारण्यास मदत झाली.
एमआयच्या फिटनेस चाचण्यांमध्ये अपयशी झाल्यानंतर रघु निवड प्रक्रियेच्या शर्यतीतून बाहेर झाला. त्याने हार न मानता त्याचा सराव सुरूच ठेवला आणि शारीरिकदृष्ट्या पुन्हा फिट होत देशांतर्गत स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करत संघात स्थान मिळवले आणि त्याची १५ वर्षांची प्रतिक्षा अखेर संपली.
रघुने देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रथम श्रेणीच्या १२ सामन्यांमध्ये ५७ विकेट्स घेतल्या आहेत. लिस्ट एच्या १२ सामन्यांमध्ये १८ विकेट्स आणि टी२० च्या ६ सामन्यांमध्ये ५ विकेट्स घेतल्या आहेत.






