---Advertisement---

वडिल सायकलपटू, पण मुलगा बनला क्रिकेटर; आता थेट मुंबई इंडियन्सकडून केले आयपीएल पदार्पण

On: रविवार, एप्रिल 10, 2022 2:59 PM
---Advertisement---

आयपीएल २०२२चा अठरावा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळवला गेला. बेंगलोरने ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला. या सामन्यात मुंबईकडून २४ वर्षीय फलंदाज रमनदीप सिंग याचे आयपीएल पदार्पण झाले. पदार्पणात त्याला विशेष छाप सोडता आली नाही. परंतु जगप्रसिद्ध टी२० लीग, आयपीएलच्या रणांगणात उतरण्याचे सौभाग्य त्याला लागले. या अनकॅप्ड फलंदाजाची क्रिकेटर बनण्याची कहाणी अतिशय रोमांचक आहे. 

रमनदीपचे (Ramandeep Singh) वडिल हरदेव सिंग हे आंतरराष्ट्रीय सायकलपटू होते. त्यांनी आशियाई गेम्स आणि आशियाई ट्रॅक चँपियनशीपमध्ये भारताचे प्रतिनिधित्त्व केले होते. परंतु रमनदीपला मात्र बालपणीपासूनच सायकलिंगमध्ये जास्त रस नव्हता.

आपल्या क्रिकेटपटू बनण्यामागची कहाणी (Ramandeep Singh Special Story) सांगताना एका मुलाखतीत त्याने म्हटले होते की, “माझ्या वडिलांनी चीनवरून माझ्यासाठी सायकल आणली होती. परंतु मला सायकलिंग आवडत नव्हती. यादरम्यान भारताने २००७ मध्ये टी२० विश्वचषक जिंकला होता. बस, त्याचवेळी मी क्रिकेटपटू बनण्याचा निश्चय केला होता. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी जी सायकल आणली होती, ती मोहालीतील आमच्या घराच्या भींतीवर शोपीस म्हणून लटकवलेली आहे. तिचे टायर आणि इतर भाग निघाले आहेत. फक्त चेसिस शिल्लक आहे.”

रमनदीपला क्रिकेटपटू बनवण्यात वडिलांची राहिलीय महत्त्वाची भूमिका
रमनदीपला क्रिकेटपटू बनवण्यामागे त्याच्या वडिलांचा मोठा हात राहिला आहे. ते स्वत: एक ऍथलिट राहिले आहेत. त्यामुळे त्यांनी बालपणीच रमनदीपला फिटनेसचे महत्त्व पटवून दिले होते. त्यासाठी आवश्यक डायटबद्दलही माहिती दिली होती. परिणामी आपल्या तंदुरुस्त शरीरयष्टीमुळे तो पंजाबच्या १६ वर्षांखालील आणि नंतर २३ वर्षांखालील संघात जागा मिळवू शकला होता. तो २०१८ मध्ये २३ वर्षांखालील वनडे स्पर्धेतील पंजाब संघाकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू राहिला होता.

त्याने ओडिसाविरुद्ध उपांत्यपूर्व फेरी सामन्यात ८६, मध्य प्रदेशविरुद्धच्या उपांत्य फेरी सामन्यात १०३ आणि अंतिम सामन्यात बंगालविरुद्ध ७५ धावा केल्या होत्या. त्याने त्याचा हाच फॉर्म कायम राखत सीके नायुडू स्पर्धाही गाजवली होती आणि पंजाबला अंतिम सामन्यात पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. विशेष म्हणजे, आयपीएल २०२२ मध्ये पंजाब किंग्जकडून खेळत असलेला प्रभसिमरन सिंग आणि मुंबई इंडियन्सचा भाग असलेला अनमोलप्रीत सिंग हे दोघे त्याचे चुलत भाऊ आहेत.

रमनदीप सिंगची कारकिर्द
समनदीपला मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians Debutant) २० लाखांच्या मूळ किंमतीला विकत घेतले होते. तो पंजाबकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. आतापर्यंत त्याने २ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने एका अर्धशतकासह १२४ धावा केल्या आहेत. तसेच १४ टी२० सामने खेळताना त्याने १०४ धावा खात्यात नोंदवल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

थर्ड अंपायरच्या निर्णयावर विराट कोहलीची आगपाखड, मैदानातून बाहेर जाताना रागाच्या भरात आपटली बॅट; पाहा रिऍक्शन

चौथा पराभव पत्करला, तरीही मुंबई इंडियन्ससाठी एक आनंदाची बातमी

IPL2022| राजस्थान वि. लखनऊ सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---