इंडियन प्रीमियर लीगच्या मागील १३ हंगामात जेतेपदाला गवसणी घालण्यात अपयशी ठरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला, आयपीएलच्या १४ व्या हंगामात चांगलाच सुर गवसला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएल २०२१ च्या पहिल्या २ सामन्यात दमदार कामगिरी करत विजय संपादन केला आहे. त्यातही बुधवारी (१४ एप्रिल) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात बेंगलोरने प्रशंसनीय कामगिरी केली. या सामन्याचा नायक ठरला २६ वर्षीय फिरकीपटू ‘शाहबाज अहमद’.
हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या या सामन्यात कोहलीच्या बेंगलोर संघाने प्रथम फलंदाजी करताना १४९ धावा केल्या होत्या. १५० धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या हैदराबाद संघाने १६ व्या षटकापर्यंत उत्कृष्ट फलंदाजी केली होती. पण १७ व्या षटकात असे काही घडले, ज्याने सामना पूर्णपणे बदलला. बेंगलोरचा कर्णधार कोहलीने १७ वे षटक टाकण्यासाठी शाहबाज अहमदला बोलवले आणि त्याने या षटकात १ धाव खर्च करत ३ गडी बाद केले. याच कामगिरीच्या जोरावर बेंगलोर संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेत आपला दुसरा विजय मिळवला.
बेंगलोरच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा शाहबाज मुळचा हरियाणाचा आहे. परंतु देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये तो बंगाल संघासाठी खेळतो. या २६ वर्षीय अष्टपैलू खेळाडूला आयपीएल २०२० मध्ये झालेल्या लिलावात बेंगलोर संघाने २० लाखांच्या मूळ किमतीत आपल्या संघात स्थान दिले होते. परंतु त्याला आयपीएल २०२० स्पर्धेत अवघे २ सामने खेळण्याची संधी मिळाली होती. आगामी हंगामात तो बेंगलोर संघासाठी मोलाची भूमिका बजावू शकतो.
शाहबाज अहमदची कारकीर्द
शाहबाज अहमदने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकूण १३ सामने खेळले आहेत. यात त्याने ५५९ धावा केल्या आहेत. यासोबतच त्याने ३७ गडी देखील बाद केले आहेत. तसेच २१ लिस्ट ए क्रिकेट सामन्यांमध्ये त्याने ४३५ धावा आणि १८ गडी बाद केले आहे. याबरोबरच देशांतर्गत क्रिकेटमध्ये २५ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने फलंदाजी करताना १९५ धावा केल्या आहेत, तर गोलंदाजी करताना २४ गडी देखील बाद केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“संघनायकाने माझ्या कुवतीवर विश्वास दाखवला याचा आनंद,” शाहबाज अहमदचे मन जिंकणारे वक्तव्य
विराटसेना पुढे वॉर्नरची पलटण फेल! कर्णधाराने ‘या’ खेळाडूंच्या माथी फोडले पराभवाचे खापर