आयपीएल २०२१ च्या ५६ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या श्रीकर भरतने शेवटच्या चेंडूवर षटकार मारला आणि दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. श्रीकर भरतला यावर्षी पहिल्यांदा आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. त्याने हंगामात आरसीबीसाठी चांगले प्रदर्शन केले आणि मिळालेल्या संधीचा योग्य फायदा घेतला आहे. शुक्रवारी (८ ऑक्टोबर) झालेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात भरतने पुन्हा एकदा त्याच्या उत्कृष्ट खेळीचे प्रदर्शन केले आहे. त्याने या सामन्यात ५२ चेंडूत ७८ धावांची नाबाद खेळी केली.
भरत देशांतर्गत क्रिकेटमध्ये आंध्र प्रदेशासाठी खेळतो आणि तो मुळचा विशाखापट्टनमचा रहिवासी आहे. आयपीएल खेळण्यापर्यंतचा प्रवास त्याच्यासाठी एका स्वप्नाप्रमाणे आहे. भरतने वयाच्या १९ व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पण २०१५ मध्ये तो पहिल्यांदा चर्चेत आला, जेव्हा तो रणजी ट्रॉफीमध्ये तिहेरी शतक करणारा पहिला यष्टीरक्षक फलंदाज ठरला. या सामन्यात त्याने गोवा संघाविरुद्ध आंध्र प्रदेशसाठी सलामीवीराची भूमिका पार पाडली आणि ३११ चेंडूत ३०८ धावा केल्या होत्या. या दमदार खेळीनंतर तो सर्वांच्या नजरेत आला.
त्याने आतापर्यंत एकूण ७८ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ९ शतक आणि २३ अर्धशतकांच्या मदतीने ४२८३ धावा केल्या आहेत.
भरतला २०१४- १५ मध्ये दिल्ली कॅपिटल्सने १० लाख रुपयांमध्ये विकत घेतले होते. पण त्याला दिल्ली संघासाठी आयपीएलमध्ये खेळण्याची एकही संधी मिळाली नाही. त्यानंतर यावर्षी झालेल्या आयपीएलच्या लिलावात आरसीबीने त्याला २० लाख रुपयांमध्ये विकत घेतले. भरतने आरसीबीसाठी या हंगामात महत्वाची भूमिका पार पाडली आहेय.
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या भारताच्या इंग्लंड दौऱ्यात भरतला संधी दिली गेली होती. त्याला राखीव खेळाडूंमध्ये ठेवले गेले होते. तसेच यावर्षी इंग्लंडविरुद्ध भारतात पार पडलेल्या मालिकेतही भरतला भारतीय संघाच्या राखीव खेळाडूमध्ये संधी दिली गेली होती. संघात संधी मिळाली असली तरी भरत अजून भारतीय संघासाठी एकदाही खेळलेला नाही. जर त्याने सध्याचा फॉर्म कायम ठेवला, तर भविष्यात लवकरच त्याला भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
भरतचा सॉलिड षटकार अन् जणू ट्रॉफी जिंकल्याप्रमाणे आरसीबीच्या ताफ्यात जल्लोष, पाहा तो क्षण
पलटणचा विषयचं वेगळा! आयपीएल २०२१मध्ये दिल्ली ‘टेबल टॉपर’, पण गुणतालिकेवर मुंबईचाच राहिलाय राज
हैदराबाद पहिल्यांदाच गुणतालिकेत तळाशी, पण खालून पहिला येण्यात ‘या’ संघांची जणू पीएचडीच झालीय!