दिग्गज क्रिकेटर रोहित शर्माने (Rohit Sharma) बुधवारी (7 मे) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून खळबळ उडवून दिली आहे रोहितने याआधीच टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पुढील महिन्यात इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी रोहितने ही घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. आता प्रश्न असा आहे की रोहित शर्मानंतर भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार कोण होऊ शकतो. यामध्ये सध्या 4 खेळाडूंची नावं चर्चेत आहेत. त्याबद्दल आपण जाणून घेऊया.
1) जसप्रीत बुमराह- रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) कसोटी संघाचा कर्णधार होण्यासाठी सर्वात मोठा दावेदार दिसतो. बुमराह सध्या कसोटी संघाचा उपकर्णधार देखील आहे आणि आतापर्यंत त्याने फक्त 3 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याच्या नेतृत्वाने सर्वांना प्रभावित केल्यामुळे बुमराह कर्णधारपदाचा दावेदार देखील आहे. 2024-25 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याने भारताचे नेतृत्व केले होते, भारताने तो सामना 295 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला.
2) शुबमन गिल- शुबमन गिल, ज्याला टीम इंडियाचा ‘प्रिन्स’ म्हणूनही ओळखले जाते. निःसंशयपणे, गिल हा भारतीय क्रिकेटचे भविष्य आहे आणि त्याने भारताच्या वनडे संघात खूप कमी वेळात उपकर्णधारपद मिळवले आहे. गिलने टी20 फाॅरमॅटमध्ये टीम इंडिया आणि आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व केले आहे. अहवालानुसार, निवडकर्त्यांना पुढील वर्ल्ड चॅम्पियनशिप सायकलसाठी एका नवीन आणि युवा कर्णधाराची आवश्यकता आहे. पुढील काही काळात गिलला नवीन कर्णधार म्हणून तयार करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
3) रिषभ पंत/श्रेयस अय्यर- श्रेयस अय्यर 2025-26 हंगामासाठी बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीत परतला आहे. अय्यर 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता, त्याने 243 धावा केल्या. अय्यरने आयपीएलमध्ये कर्णधारपदाचाही भरपूर अनुभव मिळवला आहे. दुसरीकडे, पंत देखील कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे. त्याची आक्रमक आणि तीक्ष्ण शैली त्याला भारताच्या कसोटी संघाचा यशस्वी कर्णधार बनण्यास मदत करू शकते.





