टी-20 क्रिकेटचा थरार म्हणजेच टी-20 वर्ल्ड कप 2026 सुरू व्हायला आता काहीच दिवस उरले आहेत. भारत आणि श्रीलंका (India and Shrilanka) यांच्या संयुक्त यजमानपदाखाली 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या मोठ्या स्पर्धेत एकूण 20 संघ विजेतेपदासाठी भिडणार आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक क्रिकेट तज्ज्ञ आणि दिग्गज खेळाडू आपापले अंदाज व्यक्त करत आहेत. याच दरम्यान, टीम इंडियाचा लेग स्पिनर युझवेंद्र चहलने (Yujvendra Chahal) टी-20 वर्ल्ड कपबाबत काही रंजक भविष्यवाण्या केल्या आहेत आणि ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’चे नावही सांगितले आहे.
7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेपूर्वी चहलने ‘स्टार स्पोर्ट्स’वर आपले मत मांडले. त्याने स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू आणि स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या यावर आपली मते दिली आहेत. विशेष म्हणजे, चहलने ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’साठी अभिषेक शर्मा किंवा सूर्यकुमार यादव यांची निवड केलेली नाही.
चहलने जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून निवडले आहे, तर अभिषेक शर्माला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हटले आहे. तसेच अभिषेकच या स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारेल, असा अंदाजही त्याने व्यक्त केला आहे.
टी-20 वर्ल्ड कपबद्दल चहलच्या मोठ्या भविष्यवाणी:
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज (Top Batter) – अभिषेक शर्मा
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज (Top Bowler) – जसप्रीत बुमराह
सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू – अभिषेक शर्मा
प्लेयर ऑफ द टूर्नामेंट – जसप्रीत बुमराह
सर्वात जास्त उत्सुकता असलेला सामना – भारत विरुद्ध पाकिस्तान
सर्वात मोठी सांघिक धावसंख्या (Highest Score) – 240 धावा






