झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ आता श्रीलंकेविरुद्ध 3 वनडे आणि 3 टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकात विरात कोहली आणि रोहित शर्मा भारतीय संघाचे सलामीवीर होते. मात्र आता त्यांनी टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. अशा स्थितीत टी20 मध्ये भारताची सलामीची जबाबदारी कोण निभावणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 मालिकेत शुबमन गिलसोबत अभिषेक शर्मा सलामीला दिसला होता. त्यानं सलामीला येत आपल्या दुसऱ्याच टी20 सामन्यात शतक झळकावलं होतं. तसेच अभिषेक आयपीएलमध्ये देखील सलामीला येतो. त्यानं आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी सलामी करताना शानदार कामगिरी केली होती. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत सलामीसाठी तो प्रमुख दावेदारांपैकी एक असेल.
या मालिकेसाठी सलामीला दुसरा पर्याय म्हणजे यशस्वी जयस्वाल. यशस्वी एकदिवसीय आणि टी20 मध्ये सलामीवीराची भूमिका योग्य प्रकारे पार पाडत आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या शेवटच्या तीन सामन्यांमध्ये त्यानं गिलसोबत सलामीला येत चांगली कामगिरी केली होती. अशा स्थितीत सलामीवीर फलंदाजाच्या दावेदारांमध्ये जयस्वालही आघाडीवर आहे.
शुबमन गिल झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 मालिकेत सलामीला आला होता. परंतु तो टी20 मध्ये अभिषेक किवा यशस्वीप्रमाणे वेगवान धावा करण्यासाठी ओळखला जात नाही. त्यामुळे रोहित शर्मा एकदिवसीय मालिका खेळला नाही, तर गिल आणि जयस्वाल यांची जोडी वनडेत सलामीसाठी तयार होऊ शकते.
दुसरीकडे, सलामीवीर म्हणून ऋतुराज गायकवाड देखील आपला दावा ठोकत आहे. ऋतुराज आयपीएलमध्ये चेन्नईसाठी सलामीला खेळतो. सलामीला त्याचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. अशा परिस्थितीत जयस्वाल आणि गायकवाड ही जोडी टी20 मालिकेत सलामीला पाहायला मिळू शकते.
भारत विरुद्ध श्रीलंका टी20 मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना – 27 जुलै, पल्लेकल्ले
दुसरा सामना – 28 जुलै, पल्लेकल्ले
तिसरा सामना – 30 जुलै, पल्लेकल्ले
एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना – 2 ऑगस्ट, कोलंबो
दुसरा सामना – 4ऑगस्ट, कोलंबो
तिसरा सामना – 7 ऑगस्ट, कोलंबो
महत्त्वाच्या बातम्या –
“रोहित शर्मा खूश नव्हता…”, आयपीएलमध्ये कर्णधारपदाच्या वादावरून दिग्गज गोलंदाजाचा मोठा दावा
हार्दिक पांड्याची श्रीलंका दौऱ्यातून माघार, या फॉरमॅटमध्ये खेळणार नाही! आता कोण होणार कर्णधार?
हार्दिक पांड्याचं जोरदार स्वागत…रस्त्यावर गर्दी मावेना! वडोदऱ्यात भव्य रोड शोचं आयोजन