भारतीय संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाची घोषणा झाली असून गौतम गंभीरकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. जेव्हा गंभीरची नियुक्ती झाली नव्हती, तेव्हा अनेक दिग्गज या शर्यतीत सामील होते. त्यापैकी एक नाव होतं आशिष नेहरा यांचं.
आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून आशिष नेहरानं खूप यश मिळवलं आहे. याच कारणामुळे अनेक जण त्यांना टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनण्याची शिफारस करत होते. मात्र बीसीसीआयनं गौतम गंभीरवर विश्वास दाखवला आणि टी20 वर्ल्ड कप चॅम्पियन प्रशिक्षक राहुल द्रविडच्या जागी त्याची निवड केली. त्यानंतर आता नेहरानं भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यात सध्या रस नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
आशिष नेहरानं स्वत: खुलासा केला आहे की त्याला टीम इंडियाचा कोच बनण्यात रस नाही. यामागे कुटुंबीयांचं कारण असल्याचं त्यानं सांगितलं. ‘स्पोर्ट्स तक’ला दिलेल्या मुलाखतीत आशिष नेहरा म्हणाला, “मी याबद्दल कधीच विचार केला नाही. माझी मुलं अजूनही लहान आहेत. गौतम गंभीरचीही मुलं लहान आहेत, पण प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतात. म्हणूनच मी जिथे आहे तिथे आनंदी आहे. मी सध्या नऊ महिने प्रवास करण्याच्या मूड मध्ये नाही.”
भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाचं काम सोप नाही. सध्या टीम इंडियाचं वेळापत्रक खूप व्यस्त आहे. मुख्य प्रशिक्षकालाही संघासोबत वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करावा लागतो. यामुळे प्रशिक्षकाला आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची फारशी संधी मिळत नाही. कदाचित याच कारणामुळे आशिष नेहराला त्याचं कोचिंग फक्त आयपीएलपुरतं मर्यादित ठेवायचं आहे.
आशिष नेहरानं गुजरात टायटन्ससह आपल्या प्रशिक्षक कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानं 2022 मध्ये कर्णधार हार्दिक पांड्यासोबत पदार्पणाच्या मोसमातच संघाला चॅम्पियन बनवलं होतं. नंतर पुढच्या मोसमातही संघाला फायनलमध्ये नेलं. मात्र आयपीएल 2024 मध्ये हार्दिकशिवाय गुजरातचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. त्याचवेळी, आता पुढच्या हंगामापूर्वी नेहरा गुजरात टायटन्सची साथ सोडू शकतो, अशा बातम्याही येत आहेत.
हेही वाचा –
राहुल आरसीबीत; रोहित-बुमराह अन् सूर्या मुंबईची साथ सोडणार? आयपीएल 2025 पूर्वी सर्व मोठे अपडेट्स जाणून घ्या
श्रीलंका मालिकेपूर्वी संघाला धक्का, स्टार वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर
“आपल्या सर्वांना एक दिवस जायचं आहे, पण…”; कर्करोगाशी लढा देत असलेल्या माजी क्रिकेटपटूला कपिल देवचा आधार