भारतीय क्रिकेट संघाचे (Indian cricket team) माजी सलामीवीर वीरेंद्र सहवाग (Former Cricketer Virendra Sehwag) यांनी एक मोठा खुलासा केला आहे. सेहवाग यांनी सांगितले की, त्यांनी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनण्याचा निर्णय का घेतला नव्हता. विराट कोहली (Virat Kohli) आणि बीसीसीआयच्या (BCCI) सचिवांनी सांगूनही सेहवाग यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिला होता. आता त्यांनी स्वतः यामागचं कारण सांगितले आहे.
ही त्यावेळची गोष्ट आहे, जेव्हा अनिल कुंबळे (Anil Kumble) मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करत होते. त्यावेळी कर्णधार विराट कोहलीसोबत कुंबळे यांचे संबंध चांगले नव्हते. दोघांमधील दुरावा वाढत गेला आणि जून 2017 मध्ये कुंबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता बऱ्याच वर्षांनंतर सेहवाग यांनी सांगितले की, प्रशिक्षक बनण्याच्या अगदी जवळ पोहोचल्यानंतर त्यांनी कसे नकार दिला होता.
जर विराट कोहली आणि त्यावेळचे बीसीसीआय सचिव अमिताभ चौधरी यांनी माझ्याशी संपर्क साधला नसता, तर मी अर्जही केला नसता. त्यांनी माझ्यासोबत एक बैठक घेतली, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यात सर्व काही ठीक नाहीये, त्यामुळे त्यांना हवे होते की मी अर्ज करावा आणि मुख्य प्रशिक्षक व्हावे.
सेहवाग पुढे म्हणाले की, ते 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी समालोचन (कॉमेंट्री) पॅनलमध्ये होते. त्यानंतर अनिल कुंबळे यांचा करार संपणार होता आणि असा प्लॅन होता की मी त्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यापासून प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारेन.
सेहवाग यांनी पुढे सांगितले की, स्वतःच्या पसंतीचा सपोर्ट स्टाफ न मिळाल्यामुळे त्यांनी प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. सेहवाग म्हणाले, मी ना हो म्हटले, ना नकार दिला. मी म्हणालो की जर मी जात असेेन, तर मला माझा स्वतःचा स्टाफ हवा असेल. सहाय्यक प्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण (फिल्डिंग) प्रशिक्षक, फिजिओ आणि ट्रेनर, हे सर्व मला माझ्या आवडीचे हवे आहेत. मला माझ्या पसंतीचा स्टाफ मिळाला नाही, म्हणून मी गेलो नाही.






