सर्व तर्क-वितर्कांना पूर्णविराम देत अखेर हार्दिक पांड्याची टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघामध्ये निवड झाली आहे. अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील बीसीसीआयच्या निवड समितीनं मुंबई इंडियन्सच्या या स्टार अष्टपैलू खेळाडूला फार्मात नसूनही टीममध्ये संधी दिली. आयपीएलच्या या हंगामात हार्दिक पांड्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. तो सध्या कदाचित वाईट टप्प्यातून जात असेल, त्याची कामगिरी संमिश्र असेल, मात्र हार्दिक पांड्या मोक्याच्या वेळी भारताला एकहाती सामना जिंकवून देऊ शकतो यात शंका नाही!
विश्वचषकात टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरमध्ये रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवसारखे स्फोटक फलंदाज असतील. यानंतर हार्दिक पांड्या टीम इंडियासाठी मधल्या फळीत आणि लोअर मिडल ऑर्डरमध्ये मोठी भूमिका बजावू शकतो. कर्णधार रोहित शर्माला हार्दिक पांड्याकडून केवळ फलंदाजीतच नव्हे तर गोलंदाजीतही योगदानाची अपेक्षा असेल.
हार्दिक पांड्याच्या टी20 आकडेवारीवरून दिसून येतं की हा खेळाडू या फॉरमॅटमध्ये कोणत्याही संघासाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो. त्यामुळे आयपीएलमध्ये खराब फॉर्म असूनही हार्दिक टी-20 वर्ल्ड कप संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला.
हार्दिक पांड्यानं आतापर्यंत 92 टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. या दरम्यान एक फलंदाज म्हणून त्यानं 139.83 चा स्ट्राइक रेट आणि 25.43 च्या सरासरीनं 1348 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये हार्दिक पांड्याची सर्वाधिक धावसंख्या 71 आहे. तसेच त्यानं तीन वेळा पन्नास धावांचा टप्पाही ओलांडला आहे.
याशिवाय हार्दिक पांड्यानं गोलंदाज म्हणूनही आपली छाप सोडली आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये गोलंदाज म्हणून हार्दिक पांड्याच्या नावावर 8.16 ची इकॉनॉमी आणि 26.71 च्या सरासरीनं 73 विकेट्स आहेत.
या आकडेवारीवरून हे स्पष्ट होतं की, आगामी टी20 विश्वचषकात फलंदाजीव्यतिरिक्त हार्दिक पांड्यामध्ये त्याच्या गोलंदाजीनं देखील सामना बदलण्याची क्षमता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमधील कामगिरीच्या आधारे टीम इंडियाची निवड? स्पर्धेत ठसा उमटवणाऱ्या ‘या’ 5 खेळाडूंची लागली लॉटरी
कमबॅक असावा तर असा! 17 महिन्यांनंतर मैदानावर परतताच रिषभ पंतला थेट वर्ल्ड कपमध्ये संधी!