वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा चौथा दिवस देखील शब्दशः अर्थाने पाण्यात गेला. पावसाने मेहेरबानी करायचे नाकारल्याने संपूर्ण दिवस एकाही चेंडूचा खेळ न होता रद्द करावा लागला. मात्र हाही दिवस वाया गेल्याने क्रिकेट रसिकांच्या मनात एक महत्वाचा प्रश्न उभा ठाकला आहे. तो म्हणजे, पावसाची शक्यता असतांना देखील आयसीसीने हा एवढा महत्वाचा सामना इंग्लंडमध्ये का आयोजित केला? यामागील नेमके कारण आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
सध्या सर्वाधिक चर्चेत असणारा प्रश्न म्हणजे पावसाची शक्यता असतांना देखील आयसीसीने हा इतका महत्वाचा सामना साऊथम्पटन मध्येच का आयोजित केला? कारण या सामन्याचे संपूर्ण दोन दिवस पावसामुळे वाया गेले आहेत. यामुळे आयसीसीवर या बेजबाबदारपणासाठी सडकून टीका केली जात आहे. मात्र या टीकेपूर्वी या आयोजन स्थळाची निवड करण्यामागील कारण जाणून घेणे गरजेचे आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचे आयोजन स्थळ तीन वर्षांपूर्वीच निश्चित करण्यात आले होते. त्यावेळी आयोजनाचे मैदान निश्चित करतांना लक्षात घेतल्या गेलेला मुद्दा होता तो म्हणजे इंग्लंडमधील कसोटी क्रिकेटची लोकप्रियता. इंग्लंडमधील प्रेक्षक कसोटी क्रिकेटचे निस्सीम चाहते आहेत. त्यामुळे इंग्लंड संघ अंतिम सामन्यात पोहोचला नाही तरी देखील मैदानात प्रेक्षक तुडुंब गर्दी करतील, याची सगळ्यांनाच खात्री होती.
यातील महत्वाची बाब म्हणजे हा सामना सर्वप्रथम लॉर्डस क्रिकेट मैदानावर आयोजित करण्यात आला होता. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या लॉर्डसच्या मैदानाला गौरवशाली परंपरा आहे. त्यामुळेच या मैदानावर ऐतिहासिक सामना खेळवला जाणे, हा अगदी सहज निर्णय होता. मात्र गेल्या दोन वर्षांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सगळी समीकरणे बदलली. आणि खेळाडूंना बायो सिक्युअर बबल मध्ये सामना खेळता यावा, यासाठी सोयीचे ठिकाण असलेल्या साउथम्पटनच्या मैदानावर हा सामना हलवण्यात आला.
अर्थात ही कारणे यामागे असली तरी दर्जेदार क्रिकेटमध्ये पावसाचा अडथळा आल्याने खेळाडू आणि चाहत्यांमध्ये सध्या संतापाचे वातावरण आहे. याआधी देखील आयसीसीच्या इंग्लंडमध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये पावसाने खोडा घातला होता. यावेळी देखील त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. त्यामुळे भविष्यात आयसीसीला या गोष्टीचा पुनर्विचार करावा लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
WTC फायनलमधील एकाच घटनेसाठीच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांमुळे समोरासमोर आले रोहित आणि विराटचे चाहते
एकच नंबर! वयाच्या ८३ व्या वर्षी आजीबाई करतायेत वेटलिफ्टींग; व्हिडिओ पाहून बसेल आश्चर्याचा धक्का