सर्फराज खान हा भारतीय क्रिकेटमधील आक्रमक फलंदाजी शैली असलेला फलंदाज आहे. सर्फराज खानला भारतीय वनडे आणि टी-20 संघात पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि कसोटीत आक्रमक फलंदाजी करुन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पण सर्फराजला भारतीय संघात सहज स्थान मिळालं नव्हतं. अनेक क्रिकेटपटू आयपीएलच्या एका हंगामात चमकले की भारतीय संघात स्थान मिळवतात. पण सर्फराजच्या बाबतीत असं घडलं नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने धावांचा पाऊस पाडला, तरीदेखील त्याला लगेच भारतीय संघात स्थान दिलं गेलं नव्हतं. बरेच वर्ष वाट पाहिल्यानंतर त्याला कसोटी संघात स्थान तर मिळालं, पण त्याला जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही, आता संघात पुनरागमन करण्यासाठी तो संघर्ष करतोय. दरम्यान सर्फराज खानबद्दल बोलताना माजी भारतीय खेळाडू अंबाती रायुडूने मोठं वक्तव्य केलं आहे.
सर्फराज खानने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करुन भारतीय संघाचं तिकीट मिळवलं होतं. पण त्यानंतर त्याला संघाबाहेर केलं गेलं आणि यामागचं कारण काय? हे देखील सांगण्यात आलं नव्हतं. येत्या काही दिवसात भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात देखील त्याला स्थान देण्यात आलेलं नाही. दरम्यान अंबाती रायुडूने सर्फराज खानला वगळण्याच्या मुद्द्यावर रोखठोक आणि आक्रमक भूमिका मांडली आहे. त्याला भारतीय कसोटी संघात संधी मिळायला हवी, असा ठाम दावा रायुडूने केला आहे.
एका मुलाखतीत बोलताना रायुडू म्हणाला, “सर्फराज खानला जेव्हा जेव्हा भारतीय संघात किंवा देशांतर्गत क्रिकेटमध्ये संधी मिळाली आहे, तेव्हा त्याने स्वत:ला सिद्ध करुन दाखवले आहे. असे असतानाही त्याला सातत्याने कसोटी संघातून डावलणे हे अन्यायकारक आहे.” याशिवाय, माध्यमांमध्ये पसरलेल्या ड्रेसिंग रुममधील माहिती लीक झाल्याच्या चर्चांवरही रायुडूने भाष्य केले. तो म्हणाला, “जर ड्रेसिंग रुममधील कोणत्याही वादामुळे किंवा अफवांमुळे सर्फराजवर ही कारवाई झाली असेल, तर त्याला दिलेली ही शिक्षा अतिशय कठोर आहे.
तसेच तो पुढे म्हणाला की, “रेड बॉल क्रिकेटसाठी सर्फराज खानला पूर्णपणे डावलण्यात आले आहे. जर राजकारणाला चेहरा असता, तर तो अगदी असाच दिसला असता. सर्फराजच्या राजकारणाचा बळी ठरला आहे. त्याला भारतासाठी 6 सामने खेळण्याची संधी मिळाली आहे, यादरम्यान त्याने 40 च्या सरासरीने भारतासाठी अत्यंत उत्तम कामगिरी केली आहे.”
तसेच गौतम गंभीर आणि अजित आगरकरला प्रश्न विचारत रायुडू म्हणाला, “तुम्ही अजून काय अपेक्षा करता मित्रांनो? अजित आगरकर आणि गौतम गंभीरने सर्फराज खानला संघाबाहेर का केलं? याचं कारण सांगायला हवं. सर्फराज खानने ड्रेसिंग रुममधील काही माहिती लीक केली होती अशा बातम्या होत्या आणि त्याला संघाबाहेर करण्याचं हेच कारण होतं.” आता सर्फराज खानचं पुनरागमन होणार का? आणि झालं तर मग कधी? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.






