भारतासाठी शनिवार (1 ऑगस्ट) दिवस ऐतिहासिक ठरला. ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताने आतापर्यंत एकूण 13 सुवर्णपदके जिंकली आहे. त्यापैकी 8 पदके महिला खेळाडूंनी जिंकली आहेत. चला तर मग जाणून घेऊ भारतीय ध्वजाचा गौरव वाढवणाऱ्या त्या आठ महिला खेळाडूबद्दल.
भारतासाठी पहिले सुवर्णपदक वेटलिफ्टर मीराबाई चानूने जिंकले. तिने महिलांच्या 48 किलो वजनी गटात ही कामगिरी केली. तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील तिचे हे सलग तिसरे सुवर्णपदक ठरले आहे.
भारतासाठी 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक शर्मिला धनखरने जिंकले. तिने पॅरा-ऍथलेटिक्समधील महिलांच्या शॉट पुट F57 प्रकारामध्ये ही कामगिरी केली.
अस्मिता डे ही या स्पर्धेत भारतासाठी इतिहासात पहिले ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी खेळाडू ठरली. तिने महिलांच्या 48 किलो वजनी गटात ही ऐतिहासिक सुवर्णपदकाची कामगिरी केली.
भारताला या स्पर्धेत सर्वाधिक यश बॉक्सिंगमध्ये आले, ज्यामध्ये महिलांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. पाच भारतीय महिला बॉक्सर्सने सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली.
प्रीती पवार (महिला 54 किलो) हिने भारतासाठी या आवृत्तीत पहिले बॉक्सिंगमधील सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर जास्मिन लंबोरिया (महिला 57 किलो), साक्षी चौधरी (महिला 51 किलो), प्रिया घंघास (महिला 60 किलो) आणि अरुधंती चौधरी (महिला 70 किलो) यांनी सुवर्णपदकांची कामगिरी केली. (Commonwealth Games 2026 gold medal winner indian womens list from mirabai chanu asmita dey to arundhati choudhary)
भारत पदकतालिकेत टॉप 5 मध्ये
भारताच्या दहाही बॉक्सर्सनी पदके जिंकल्याने भारताच्या पदकांमध्ये मोठी भर पडली. भारताच्या एकूण पदकांमध्ये शनिवारी 16 संख्येने भर पडली, ज्यामध्ये 8 सुवर्ण, 5 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. यामुळे भारताच्या पदकांची एकूण संख्या 39 झाली आहे. त्यामुळे भारत पदकतालिकेत आता चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.






