भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आगामी श्रीलंका दौऱ्यातील कसोटी मालिकेतून बाहेर झाल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारती क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये (CoE) केलेल्या प्राथमिक तपासणीनंतर त्याच्या डाव्या गुडघ्यात अस्वस्थता जाणवत असल्याचे कळते. त्यामुळे मेडिकल पथकाने त्याला संघपुनरागमन करण्याआधी पूर्णपणे बरे होण्याचा सल्ला दिला आहे. आता त्याचाजागी कोण खेळेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
श्रीलंका विरुद्ध भारत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला येत्या 15 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. पहिला सामना गॉल येथे खेळला जाणार आहे. ही मालिका ICC कसोटी अजिंक्यपद 2025-27 चा भाग आहे. त्यामुळे भारताला यामध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे, मात्र याआधीच संघाला मोठा धक्का बसला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, बुमराह या दोन सामन्यांच्या महत्त्वाच्या मालिकेतून बाहेर झाला आहे.
BCCI ने अद्याप बुमराहबद्दलची माहिती अधिकृतपणे जाहीर केलेली नाही.
भारतासाठी पुढे अनेक महत्त्वाचे आणि मोठे दौरे आहेत, ज्यामुळे बुमराहच्या बाबतीत योग्य निर्णय घेतल्याचे दिसते. भारताला येत्या महिन्यांमध्ये आशियाई खेळ, न्यूझीलंड दौरा त्याचबरोबर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसुद्धा खेळायची आहे. यामुळे दीर्घ कालावधीचा विचार करता बुमराहच्या बाबतीत कोणतीही जोखीम न घेण्याचा विचार केला गेला.
श्रीलंका दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात वेगवान गोलंदाजांमध्ये मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनूर ब्रार यांचा समावेश आहे. आता बुमराह बाहेर झाल्याने निवड समिती कोणाला संधी देते, हे जाणून घेणे चुरशीचे ठरेल.
तसे पाहता औकिब नबीचे नाव आघाडीवर आहे. त्याने यावर्षीच्या रणजी ट्रॉफीमध्ये जम्मू-काश्मिरच्या ऐतिहासिक विजेत्या मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. तो या स्पर्धेत तेव्हा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता. त्याचा परिणाम म्हणून त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमात्र कसोटीमध्ये संघात निवडले होते.
तसेच नबीने नुकतेच भारत अ संघासोबत श्रीलंकेचा दौरा केला आहे. त्यामध्ये त्याने श्रीलंका अ विरुद्ध 2 अनाधिकृत कसोटी सामन्यांमध्ये खेळताना 6 विकेट्स घेतल्या होत्या.
भारताने या दौऱ्यासाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला होता, तो पुढीलप्रमाणे
शुबमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन*, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, जसप्रीत बुमराह*, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन. (*फिटनेसवर आधारित)
श्रीलंका विरुद्ध भारत कसोटी मालिकेचे वेळापत्रक –
पहिला सामना – 15 ते 19 ऑगस्ट, 2026 (गॉल)
दुसरा सामना – 23 ते 27 ऑगस्ट, 2026 (कोलंबो)






