राजस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू रियान पराग आयपीएल 2024 मध्ये जबरदस्त फॉर्मात आहे. सोमवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध 54 धावांची नाबाद स्फोटक खेळी खेळल्यानंतर त्याला ‘ऑरेंज कॅप’ देण्यात आली, जी स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजाला दिली जाते. मात्र गमतीची गोष्ट म्हणजे, विराट कोहलीनंही आयपीएल 2024 मध्ये पराग इतक्याच (181) धावा केल्या आहेत. तरीही ऑरेंज कॅप रियान परागलाच का देण्यात आली? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला तर मग, या प्रश्नाचं उत्तर या बातमीद्वारे जाणून घ्या.
धावा समान असूनही रियान परागला विराट कोहलीच्या ऐवजी ऑरेंज कॅप देण्यामागे कारण आहे तो त्याचा स्ट्राइक रेट. परागचा स्ट्राइक रेट 160.17 आहे. तर कोहलीचा स्ट्राइक रेट 141.40 आहे. म्हणजे पराग कमी चेंडूत जास्त धावा करतोय, यामुळे तो कोहलीच्या पुढे आहे. आयपीएल 2024 मध्ये या दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत दोन अर्धशतके झळकावली आहेत. मात्र पराग षटकारांच्या बाबतीतही कोहलीच्या पुढे आहे. परागनं आतापर्यंत 12 षटकार मारले असून, कोहलीच्या बॅटमधून 7 षटकार निघाले आहेत.
मुंबईविरुद्धच्या शानदार खेळीनंतर प्रतिक्रिया देताना रियान पराग म्हणाला की, “गेल्या 3-4 वर्षात माझी आयपीएलमधील कामगिरी चांगली राहिली नाही. जेव्हा परफॉर्मन्स येत नाही, तेव्हा पुनरागमन करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. मी खूप सराव केला आहे. मला अशा परिस्थितीची सवय आहे. माझ्या वडिलांना घरून सगळं बघायला आवडतं. त्यांना सगळ्याचं विश्लेषण करायला आवडतं. मात्र माझी आई इथे स्टेडियममध्ये हजर होती.”
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सला निर्धारित 20 षटकांत 9 विकेट गमावून केवळ 125 धावा करता आल्या. राजस्थानासाठी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टनं 22 धावांत 3 बळी घेतले. तर लेगस्पिनर युजवेंद्र चहलनं 11 धावांत 3 जणांना तंबूत पाठवलं.
प्रत्युत्तरात, धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सनं 15.3 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्य गाठलं. यात रियान परागच्या अर्धशतकाचाही समावेश आहे. राजस्थाननं हा सामना सहा गडी राखून सहज जिंकला. या विजयासह राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शाळेतील शिक्षिकेवरच फिदा झाला होता ट्रेंट बोल्ट! कशी सुरू झाली प्रेमकहाणी? जाणून घ्या
वानखेडेवर रियान परागचं वादळ! मुंबईची पराभवाची हॅट्रिक, राजस्थानचा सलग तिसरा विजय
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज, रोहित शर्माच्या नावे लज्जास्पद विक्रम