भारताने आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला विजयी सुरुवात केली आहे. त्यांनी अॅडलेड कसोटी जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात भारताकडून फलंदाजीमध्ये चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि तळातल्या फलंदाजांकडून चांगली कामगिरी झाली. मात्र या सामन्यात भारताचे सलामीवीर फलंदाज मुरली विजय आणि केएल राहुल, तसेच रोहित शर्मा यांनी निराशा केली आहे.
रोहित शर्माला तर जवळ जवळ 10 महिन्यांनतर भारताच्या कसो़टी संघात संधी मिळाली होती. पण त्यालाही त्याचा फायदा घेता आलेला नाही.
त्यातच भारतीय संघासमोर मागील काही सामन्यांपासून सलामीच्या जोडीला धावा करण्यात अपयश येत असल्याने पुढील सामन्यात त्या जागेवर कोणाला खेळवायचे हा मोठा प्रश्न आहे. तसेच पृथ्वी शॉ दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे भारताकडे केएल राहुल, मुरली विजय आणि पार्थिव पटेल यांचे सलामीवीर फलंदाज म्हणून पर्याय आहेत.
पण यावर्षी राहुलने कसोटीत सलामीला फलंदाजी करताना 9 सामन्यात 25.26 च्या सरासरीने 379 धावाच केल्या आहेत. तसेच विजयनेही यावर्षी 7 सामन्यात 20.15 च्या सरासरीने 262 धावा केल्या आहेत. ही आकडेवारी पाहता मुरली आणि राहुल हे दोघेही सातत्याने अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
तसेच रिषभ पंत यष्टीरक्षक म्हणून पहिली पसंती असल्याने पार्थिवला संघात संधी मिळणे कठीण आहे. त्याचबरोबर केएल राहुलही सातत्याने संधी देऊनही अपयशी ठरत आहे. त्याने अॅडलेड कसोटीत पहिल्या डावात तर साफ निराशा केली होती, तर दुसऱ्या डावात 44 धावा करत चांगली सुरुवात केली होती. परंतू त्याला त्याचे मोठ्या धावसंख्येत रुपांतर करण्यात अपयश आले.
तसेच मुरली विजयही मागील काही सामन्यात अपयशी ठरला आहे. पण त्याने यावर्षी इंग्लंडमध्ये कौउंटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला आणि राहुल ऐवजी मधल्या फळीत सातत्याने अपयशी ठरणाऱ्या रोहित शर्माला सलामीला संधी दिल्यास भारताला फायदा होऊ शकतो.
रोहितने आत्तापर्यंत कधीही कसोटीमध्ये सलामीला फलंदाजी केलेली नाही. पण त्याने वनडेमध्ये सलामीला फलंदाजी करताना 109 सामन्यात 58.37 च्या सरासरीने 5487 धावा केल्या आहेत. ही वनडेतील आकडेवारी पाहता रोहितला कसोटीत सलामीला एकतरी संधी द्यायला हवी ज्यामुळे त्यालाही स्वत:ला सिद्ध करण्यासाठी चांगली संधी मिळेल.
सध्या रोहित कसोटीत सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो त्यामुळे त्याला स्थिर होण्यासाठी वेळ मिळत नाही. त्याचाच परिणाम त्याच्या फलंदाजीवर होतो.
रोहित हा आक्रमक फलंदाज आहे. तसेच त्याची मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमधील सलामीला खेळतानाची कामगिरी कौतुकास्पद आहे. त्याचा त्याला चांगला अनुभवही आहे. तो मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्येही सलामीला फलंदाजी करताना थोडा वेळ घेतो आणि मग आक्रमक फटके खेळायला सुरुवात करतो.
त्यामुळे तो कसोटीतही भारताला चांगली सुरुवात करुन देऊ शकतो. तसेच त्याच्याबरोबर दुसरी बाजू सांभाळण्यासाठी शांततेत खेळ करणारा विजय असेल, ज्यामुळे तो एक बाजू सांभाळू शकेल.
तसेच या दोघांनंतर भारताकडे विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे असे फलंदाज असतील. तर तळातली फलंदाजी सांभाळण्यासाठी रिषभ पंत आणि आर अश्विन असतील.
महत्त्वाच्या बातम्या:
–मोठी बातमी- २०१९आयपीएल लिलावासाठी अंतिम खेळाडूंची निवड जाहीर
–आयपीएलचे माजी अध्यक्ष ललीत मोदींच्या पत्नीचे निधन
–केएल राहुलच्या त्या कॅचवर प्रश्न उपस्थित केल्याने टीम इंडियाचे चाहते भडकले