दक्षिण आफ्रिका हा जगातील सर्वोत्तम क्रिकेट संघांपैकी एक संघ. अगदी सुरुवातीपासूनच या संघाच्या खेळाडूंना जगभरातून प्रेम मिळते. केवळ कागदावरच नाही, तर मैदानावरही या संघाने खेळाच्या जोरावर चाहत्यांची मने जिंकली आहेत, पण जेव्हा आयसीसीच्या मोठ्या स्पर्धा आणि विशेषत: वर्ल्डकपचा विचार केला जातो, तेव्हा या संघाला चोकर्स म्हटले जाते. मात्र, त्यांना चोकर्स असं का म्हणतात? याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा खास लेख.
तब्बल बावीस वर्ष वर्णभेदाच्या कारणाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित असलेल्या दक्षिण आफ्रिकेने 1992 मध्ये पुनरागमन केले. तेव्हापासून ते एक मजबूत संघ म्हणून ओळखले जाऊ लागले. दक्षिण आफ्रिका क्रिकेटच्या या नव्या पिढीने जगभरात आपल्या खेळाने आदर कमवला. ऍलन डोनाल्ड, हॅन्सी क्रोनिए, लान्स क्लुसनर, शॉन पोलॉक, रिचर्डसन हे क्रिकेटर स्टार म्हणून ओळखले जाऊ लागले. क्रिकेटविश्वातील सर्वात धोकादायक संघ म्हणून त्यांची नवी ओळख झाली. 1992 पासून 2019 पर्यंत झालेल्या 8 वर्ल्डकपपैकी चारमध्ये त्यांनी सेमी फायनलही गाठली. मात्र, कधी त्यांचे दुर्दैव आड आलं, तर कधी त्यांनी केलेल्या काही चुकांमुळे त्यांचं नुकसान झालं. याच कारणाने त्यांच्यावर चोकर्सचा शिक्का बसला तो कायमचा.
सन 1992च्या वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिका सहभागी झाली. धमाकेदार खेळ करत ते सेमीफायनलपर्यंत गेलेही. सेमी फायनल होती इंग्लंडविरुद्ध. 252 रन्सचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने मोठी मजल मारली. 13 बॉल 22 रन्सची आवश्यकता असताना अचानक पाऊस आला. क्रिकेटजगताला त्यादिवशी एक नवा नियम समजला. तो होता डकवर्थ लुईस. आवाक्यात दिसत असलेल आव्हान अचानक बदलून झालं 1 बॉल 22. हे अशक्यप्राय आव्हान पार होणार नव्हतेच. इथे नशिबाने दगा दिला दक्षिण आफ्रिका पहिल्यांदा चोक झाली.
याच वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिका सर्वात पहिल्यांदा चोक झाली असली, तरी त्यांच्यावर चोकर्सचा शिक्का लागण्यासाठी कारणीभूत ठरला 1999 वर्ल्डकप. फेवरेट्स म्हणून ते वर्ल्डकपमध्ये सहभागी झाले. खेळही तसाच दाखवला. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा एक पराभव सोडता त्यांनी सार्या मॅचेस जिंकल्या आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. सेमीफायनलला पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचसमोर होती. इथं हर्षल गिब्सने आततायीपणा केला आणि सेलिब्रेशनच्या नादात ऑसी कॅप्टन स्टीव्ह वॉचा कॅच सोडला. तिथेच वॉ म्हणाला, “हर्ष तू कॅच नव्हे वर्ल्डकप सोडलाय.” पुढे त्याच वॉने ऑस्ट्रेलियाला शतक ठोकून 270पर्यंत नेले. दक्षिण आफ्रिका चेस करताना 5 विकेट 213 अशा सुस्थितीत होती. मात्र, अचानक संघ ढेपाळला आणि शेवटच्या ओव्हरला एक विकेट आणि 9 रन राहिले. त्या वर्ल्डकपचा हिरो राहिलेल्या लान्स क्लुसनरने पहिले दोन्ही बॉल फोर मारले. तिसरा बॉल डॉट गेल्यावर चौथ्या बॉलला गरज नसताना क्लुसनर आणि नॉन स्ट्रायकर एलन डोनाल्ड एका रनासाठी धावले आणि घात झाला. डोनाल्ड रन आऊट झाल्याने मॅच टाय झाली. त्यावेळी आतासारखा सुपर ओव्हरचा नियम नसल्याने लीग स्टेजमधील दोन्ही संघातील मॅचमधील विजेत्याला फायनलमध्ये संधी दिली गेली. तो संघ होता ऑस्ट्रेलिया. यावेळी दक्षिण आफ्रिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली.
सन 2003 मध्ये स्वतः वर्ल्डकप आयोजक असलेल्या दक्षिण आफ्रिकेला पहिल्याच राऊंडमधून गाशा गुंडाळावा लागलेला. श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या ग्रुप मॅचमध्ये त्यांना विजय हवाच होता. 268 रन्स चेस करताना ते 45 ओव्हरमध्ये 6 विकेट 229 पर्यंत पोहोचलेले. त्यावेळी पावसाने हजेरी लावली आणि पुन्हा खेळ होऊ शकला नाही. डकवर्थ लुईस नियमानुसारही मॅच टाय होत होती. मॅचमध्ये टाकलेल्या शेवटच्या बॉलवर मार्क बाऊचरने एक रन काढला असता, तर दक्षिण आफ्रिका डकवर्थ-लुईस नियमाने जिंकली असती. मात्र, दूरवर बॉल मारूनही रन न काढण्याचा तो निर्णय त्यांना वर्ल्डकपमधून बाहेर घेऊन गेला.
या तिन्ही घटनांमधून त्यांनी बोध घेतला नाही आणि 2011 वर्ल्डकपवेळी न्यूझीलंडविरुद्ध क्वार्टर फायनलमध्ये 212 रन चेस करताना 2 विकेट 108 या सुस्थितीतून 172 रन्सवर ऑल आऊट झाले. 2015 मध्ये पुन्हा एकदा सेमीफायनलमध्ये त्यांनी प्रवेश केला. मात्र, सलग दुसऱ्यांदा न्यूझीलंडने त्यांची वाट रोखली. नेहमीच फेवरेट्स म्हणून वर्ल्डकपमध्ये सहभागी होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेवरील हा चोकर्सचा शिक्का पुसला जाणार का? याचे उत्तर भारतात होणाऱ्या विश्वचषकात मिळू शकते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जन्माने आयरिश असलेला पठ्ठ्या फक्त आईमुळे इंग्लंडकडून खेळू शकला, देशाच्याच भल्यासाठी सोडलं क्रिकेट
भारतीय बॉलिंगचा मूळपुरुष निसार! स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानात जाऊन हलाखीत जगला