उन्मुक्त चंद, हे नाव ऐकल्यावर शतकाच सेलिब्रेशन करतानाचा किंवा विश्वचषक उंचावलेला एक भारतीय क्रिकेटर पटकन डोळ्यासमोर येतो. सोबतच आठवते विराट कोहली, एमएस धोनी यांच्या सोबतची त्याची कोल्ड्रिंक्सची जाहिरात. २०१२ ला ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात मात देत १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार उन्मुक्त चंद. फायनलला स्वतः नॉट आउट शतक मारत त्यान तिसऱ्यांदा विश्वचषक यंग इंडियाला जिंकून दिलेला. पण हाच उन्मुक्त नंतर असा काही अपयशी ठरला की त्याला भारत सोडावा लागला. आज भारतीय क्रिकेटच्या याच एका लौकिकाला न जागलेल्या क्रिकेटरचा जीवनपट उलगडू या.
१९ वर्षांखालील विश्वचषक जिंकल्यानंतर जिकडे-तिकडे उन्मुक्तच्या नावाचा डंका वाजू लागलेला. अनेकांनी त्याची तुलना दुसरा दिल्लीकर वर्ल्डकप विनिंग कॅप्टन विराट कोहलीसोबत करायला सुरुवात केलेली. खडूस ऑस्ट्रेलियन इयान चॅपेलने ‘भारताचा भविष्यातील सर्वात मोठा खेळाडू’ असे म्हणत त्याची स्तुती केली. काही दिवसातच तो टीम इंडियाच्या सीनियर खेळाडूंसोबत जाहिरातींमध्ये चमकू लागला. इंडिया ए संघाची कॅप्टन्सी त्याला दिली गेली. तो लवकरच टीम इंडिया आता खेळणार असे सर्वांना वाटू लागले. मात्र, इच्छा असलेले सर्वकाही पदरात पडते असे नाही ना? नेमके हेच उन्मुक्तसोबत घडले.
साल २०१३ आयपीएलच्या उद्घाटन सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी खेळताना त्याने सीझनच्या पहिल्या बॉलचा सामना केला. त्याच्यासमोर होता ऑस्ट्रेलियाचा दिग्गज ब्रेट ली. लीने पहिला बॉल असा काही वेगात टाकला की, उन्मुक्तच्या दांड्या गुल झाल्या. खऱ्या अर्थाने त्याच्या वाईट वेळेची सुरुवात इथूनच झाली. पूर्ण सीझनमध्ये सात मॅच खेळून तो केवळ ६१ धावा बनवू शकला. पुढच्या सिझनला राजस्थान रॉयल्सने आणि त्यानंतरच्या दोन सीझनमध्ये त्याला मुंबई इंडियन्सने आपल्या टीममध्ये सामील करून घेतले. आऊट ऑफ फॉर्म असल्याने तो नेहमी बेंचवर बसलेला दिसला. याच दरम्यान त्याच्याकडून इंडिया ए संघाची कॅप्टन्सी काढून घेतली गेली.
उन्मुक्तच्या आयुष्यात आणखी वाईट दिवस यायचे अजुन बाकी होते. २०१७ मध्ये त्याला दिल्लीच्या रणजी संघातून वगळले गेले. आयपीएलमध्ये देखील कोणी भाव दिला नाही. तो पूर्णता खचला. वर्षभर क्रिकेटपासून दूर राहिला. २०१९ मध्ये त्याने आपले मूळ राज्य असलेल्या उत्तराखंडकडून खेळताना कमबॅक केला. त्याठिकाणी देखील त्याच्या हाती अपयशच आले. इतकेच काय तर २०२० च्या १९ वर्षांखालील विश्वचषकावेळी तो चक्क कॉमेंट्री करताना दिसला.
क्रिकेटर ते कॉमेंटेटर या प्रवासादरम्यान तो लेखकसुद्धा बनला होता. २०१३ मध्ये ‘स्काय इज द लिमिट’ या त्याने लिहिलेल्या पुस्तकासाठी वेस्ट इंडीजचे दिग्गज विवियन रिचर्ड्स यांनी प्रस्तावना लिहिली, तर कव्हरवर विराट कोहलीने त्याच्या केलेल्या कौतुकाचे शब्द आहेत. २०२१ मध्ये इंडियन क्रिकेटमधून रिटायरमेंट घेत तो अमेरिकेला सेटल झाला. अमेरिकेसाठी इंटरनॅशनल क्रिकेट खेळायचा तो प्रयत्न करतोय. बिग बॅशमध्ये खेळणारा तो पहिला इंडियनही बनला. आता लग्न करून संसारातही रमलाय.
उन्मुक्त भारतासाठी का खेळला नाही? हा प्रश्न प्रत्येक क्रिकेटप्रेमी व जाणकारांना नेहमी सतावत असतो. कारण, त्याने ज्या झोकात आपल्या स्टाइलिश फलंदाजीने चाहते निर्माण केले होते. त्यावरून तो जास्तीत जास्त दोन वर्षात भारतीय संघाची कॅप डोक्यावर चढवेल असे वाटत होते. टीम इंडियातील चुरस हे तो भारतीय संघासाठी न खेळण्याचे महत्त्वाचे कारण ठरले. तो ज्यावेळी फॉर्ममध्ये होता त्यावेळी वीरेंद्र सेहवाग व गौतम गंभीर ही दिल्लीकर जोडीच भारतासाठी ओपनिंगला येत. त्यानंतर ही जागा रोहित शर्मा व शिखर धवन यांनी आपल्या नावे केली. मधल्या काळात धवन थोडाफार मागे पडू लागला, तेव्हा उन्मुक्त क्रिकेटच्या मुख्य प्रवाहापासून खूप दूर गेला होता.
अगदी कमी वयात अफाट लोकप्रियता मिळवल्यानंतर चाहत्यांच्या अपेक्षांच्या ओझ्याच्या दबावाखाली उन्मुक्त अक्षरशः चेपला गेला. आता तो पुढील करियर कसे घडवतो हे पाहावे लागेल. पण कमी वयात मिळालेले यश चिरकाल राहत नाही, याचे उत्तम उदाहरण उन्मुक्तमुळे साऱ्याच युवा क्रिकेटपटूंना मिळाले. यात शंकाच नाही.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
जरा इकडे पाहा! आयपीएल कॉमेंटेटरना पगार मिळतो तरी किती?
बाप तर बाप, बेटा ही खेळला टीम इंडियासाठी; पाहा क्रिकेटर पिता-पुत्रांच्या जोड्या
क्रिकेट विश्वातील दारूडे क्रिकेटर्स, ज्यांनी घातले राडे, टाका एक नजर