येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात साउथॅम्प्टनच्या मैदानावर विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. त्यांनतर इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंना प्राधान्य दिले आहे. यामध्ये वॉशिंग्टन सुंदरचा देखील समावेश आहे. या दौऱ्यावर जाण्यापूर्वी वॉशिंग्टन सुंदरच्या वडिलांनी मन जिंकणारे कृत्य केले आहे.
येत्या जून महिन्यात भारतीय संघ इंग्लंड साठी रवाना होणार आहे. लवकरच संघातील खेळाडू, मुंबईत एकत्र जमणार आहेत. तत्पूर्वी बीसीसीआयने सांगितले आहे की, ज्या खेळाडूची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येईल, त्या खेळाडूंना इंग्लंडला जाता येणार नाही. त्यामुळे सर्वच खेळाडू खबरदारी घेताना दिसून येत आहेत. अशातच वॉशिंग्टन सुंदरला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून त्याच्या वडिलांनी मोठा त्याग केला आहे. त्याचे वडील, कुटुंबासोबत न राहता दुसऱ्या घरात राहत आहेत. परंतु ते आपल्या कुटुंबासोबत ऑनलाईन जोडलेले असतात.
सुंदरचे वडील, आयकर विभागात प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना आठवड्यातून तीन, चार दिवस ऑफिसला जावे लागते. त्यामुळे ते कोरोना संसर्ग असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात येऊ शकतात. म्हणून त्यांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, “वॉशिंग्टन सुंदर जेव्हापासून घरी परतला आहे, तेव्हापासून मी दुसऱ्या घरात राहत आहे. तसेच माझी पत्नी आणि मुलगी वॉशिंग्टन सुंदर सोबत राहत आहेत. कारण त्या बाहेर येणं जाणं करत नाहीत. मी फक्त त्यांना व्हिडिओ कॉलवर पाहू शकतो. मला कामानिमित्त ऑफिसला जावे लागते आणि माझ्यामुळे घरात कोरोना यावा अशी माझी इच्छा नाही.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “त्याला आधीपासूनच लॉर्ड्स आणि इंग्लंडच्या इतर मैदानावर खेळायचे होते. ही त्याची खूप आधीपासूनची इच्छा होती. हा दौरा कुठल्याही किमतीत रद्द व्हावा अशी त्याची इच्छा नाही.”
महत्त्वाच्या बातम्या –
“हा तुमच्या काकाचा संघ नाही की, तुम्ही प्रत्येक फॉरमॅटमध्ये सलामी फलंदाजी कराल”
मोठ्या मनाचा खेळाडू! सीएसकेच्या ‘या’ खेळाडूने केलेल्या मदतीबद्दल सोनू सूदने मानले आभार