वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सोमवारी (२६ जुलै) बार्बाडोस येथे तिसरा आणि शेवटचा वनडे सामना पार पडला आहे. पाहुण्या ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत ११७ चेंडू बाकी असताना ६ विकेट्सने हा सामना जिंकला आहे. तसेच वनडे मालिकाही २-१ ने खिशात घातली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध ४-१ ने टी२० मालिक गमावल्यानंतर वनडे मालिका जिंकत ऑस्ट्रेलियाने दौऱ्याचा गोड शेवट केला आहे.
तिसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजच्या १५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडने सर्वाधिक ५१ धावांची खेळी केली. त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत ५२ चेंडूंमध्ये २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने नाबाद अर्धशतक करत ३१ व्या षटकातच संघाचा विजय साजरा केला. त्याला ऍश्टन ऍगरनेही नाबाद १९ धावा करत पुरेपुर साथ दिली. तसेच ऍलेक्स कॅरी (३५ धावा) आणि मिचेल मार्श (२९ धावा) यांनीही महत्त्वाचे योगदान दिले.
वेस्ट इंडिजकडून केवळ शेल्डन कॉट्रेल, अखिल हुसैन आणि हेडन वॉल्श प्रत्येकी १ विकेट घेऊ शकले.
तत्पुर्वी प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजकडून सलामीवीर एविन लेविसने शेवटपर्यंत फलंदाजी करत सर्वाधिक ५५ धावा केल्या. ६६ चेंडूंमध्ये ३ षटकार आणि ५ चौकार मारत त्याने ही धावसंख्या केली. त्याच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला साध्या २० धावाही करता आल्या नाहीत. केवळ डॅरेन ब्रावे १८ धावापर्यंत मजल मारू शकला आणि ४५.१ षटकापर्यंत वेस्ट इंडिज संघ १५२ धावा करू शकला होता.
वेस्ट इंडिजला दीडशे धावांपर्यंत रोखण्यात ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्क याचा मोठा हात राहिला. त्याने ४३ धावा देत वेस्ट इंडिजचे ३ महत्त्वपुर्ण फलंदाज बाद केले. तसेच जोश हेजलवुड, ऍश्टन ऍगर आणि ऍडम झम्पा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
दुखापतींनी पिडलेल्या विराटसेनेसाठी आली आनंदाची बातमी, ‘प्रमुख खेळाडू’ने सुरू केला सराव
कोहलीचा आयपीएल भिडू पडिक्कलला इंग्लंडवरुन का आलं नाही बोलावण? कारण आले पुढे