बांग्लादेशने शेवटच्या टी20 मध्ये वेस्ट इंडिजचा पराभव करून इतिहास रचला आहे. या विजयासह बांग्लादेशने यजमानांचा मालिकेत 3-0 असा व्हाईटवॉश केला. बांग्लादेशने पहिला सामना 7 धावांनी आणि दुसरा सामना 27 धावांनी जिंकला. बांग्लादेशला पहिल्यांदाच वेस्ट इंडिजमध्ये व्हाईटवॉश करण्यात यश आले आहे. या मालिकेपूर्वी बांग्लादेशी संघाला वेस्ट इंडिजच्या भूमीवर एकही सामना जिंकण्यात यश आले नव्हते. किंग्सटाउनमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात बांग्लादेशने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 190 धावांचे लक्ष्य ठेवले होते. ज्यासमोर यजमान संघ 109 धावांवर गारद झाला. बांग्लादेशने शेवटचा टी20 सामना 80 धावांनी जिंकला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या बांग्लादेश संघासाठी जखर अलीने 41 चेंडूत 72 धावांची शानदार खेळी केली. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 6 षटकार मारले. त्याच्याशिवाय परवेझ हुसैन इमॉनने 39 धावांचे योगदान दिले.
190 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली नाही. डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर ब्रेंडन किंग तस्किन अहमदचा बळी ठरला. यानंतर पॉवरप्लेमध्येच निकोलस पूरनसह वेस्ट इंडिजचे तीन गडी बाद झाले. 6.5 षटकात 46 धावा असताना निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये होता. यानंतर रोमारियो शेफर्डने 27 चेंडूत 33 धावा केल्या, मात्र तो संघाचा पराभव टाळू शकला नाही. वेस्ट इंडिजचा संघ 20 षटकेही टिकू शकला नाही आणि 16.4 षटकांत गडगडला. जखर अलीने खेळलेल्या शानदार खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. तर मेहदी हसनची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली.
टी20 मालिकेआधी खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजने बांगलादेशचा व्हाईटवॉश केला होता, तर 2 सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली.
हेही वाचा-
PAK vs SA; मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानची मजबूत कामगिरी, आफ्रिकेला नमवले
IND VS AUS; शेवटच्या दोन कसोटींसाठी संघाची घोषणा, 19 वर्षीय खेळाडूला संधी
चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी संघाला धक्का, या मुख्य स्पर्धेत खेळणार नाही हार्दिक पांड्या, मोठे कारण समोर