भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज विराट कोहली याची गणना जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये होते. विराटने त्याच्या कारकीर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. त्यामुळे फक्त चाहतेच नाही, तर आजी-माजी क्रिकेटपटू त्याचे कौतुक करताना थकत नाहीत. आता विराटचे कौतुक करणाऱ्या खेळाडूंमध्ये वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू कर्टनी वॉल्श यांच्या नावाचाही समावेश झाला आहे. त्यांच्या मते, महान फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकर याच्यानंतर विराट कोहली आहे.
विराटचा 500वा सामना
खरं तर, विराट कोहली (Virar Kohli) वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत त्याचा 500वा आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे. या कसोटीच्या पहिल्या डावात विराट नाबाद 87 धावांवर खेळत आहे. अशात त्याला शतकासाठी फक्त 13 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे या धावा करताच तो, 500व्या कसोटीत शतक ठोकणारा जगातील पहिलाच खेळाडू बनेल.
काय म्हणाले कर्टनी वॉल्श?
वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज वेगवान गोलंदाज कर्टनी वॉल्श (Courtney Walsh) म्हणाले की, “एक महान भारतीय खेळाडूच्या रूपात मी विराटला सचिनच्या मागे ठेवेल. ब्रायन लारा, विव रिचर्ड्स यांना मी वेस्ट इंडिजच्या दृष्टीने पाहील. मी माझ्या काळात पाँटिंग आणि स्टीव्ह वॉ यांच्यासोबतही खेळलो आहे. विराटला मी अव्वल 4-5 महान खेळाडूंमध्ये ठेवेल, ज्यांना खेळताना मी पाहिलं आहे.”
वॉल्श यांनी विराटची जोरदार प्रशंसा केली. त्यांनी विराटची पाकिस्तानचे माजी खेळाडू जावेद मियांदाद आणि इंग्लंडचे ग्राहम गूच यांच्याशीही तुलना केली. जिओ सिनेमावर बोलताना वॉल्श म्हणाले की, “इंग्लंडचे ग्राहम गूच आणि पाकिस्तानचे जावेद मियांदाद यांच्यासोबत मी तेवढे सामने खेळलो नाहीये. मात्र, ज्याप्रकारे ते त्यांच्या विकेटसाठी खेळू शकत होते, विराटबद्दलही मी तेच म्हणेल.”
वॉल्श यांनी विराटसोबत झालेल्या चर्चेबाबतही खुलासा केला. ते म्हणाले की, “विराटमध्ये खेळाची आवड आहे, खेळात त्याला आपली छाप सोडायची आहे. मला आठवते की, जेव्हा मी वेस्ट इंडिजचा निवडकर्ता होतो आणि तो कर्णधार होता, तेव्हा माझी त्याच्यासोबत चर्चा झाली होती. आम्ही चर्चा करत होतो, तुम्ही म्हणू शकता की, त्याला सर्वोत्तम बनायचे आहे. तो कोणाकडूनही सल्ला घेण्यासाठी तयार होता, ज्यातून त्याला मदत मिळेल. प्रत्येक गोष्टीत त्याला टॉप-3, टॉप-5मध्ये राहायचे आहे.”
दुसऱ्या कसोटीत विराटकडे शतक करण्याची संधी
दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी विराट कोहलीने शानदार खेळ खेळला. क्रीझवर टिच्चून फलंदाजी करत विराटने शॉट्सही मारले, ज्यात त्याचा कव्हर ड्राईव्ह हा सिग्नेचर शॉटही पाहायला मिळाला. विराट त्याच्या शतकापासून 13 धावा दूर आहे. त्याने परदेशात कसोटीत खेळताना डिसेंबर 2018मध्ये शेवटचे शतक ठोकले होते. (wi vs ind 2nd test courtney walsh big statement on virat kohli)
महत्त्वाच्या बातम्या-
विराटसोबत बॅटिंग केल्यानंतर नव्या दमाच्या यशस्वीची सर्वात मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मी धन्य झालो…’
‘मला वाटतंय माझ्या संयमाचा…’, संघातून बाहेर असलेल्या धवनचा व्हिडिओ जोरदार व्हायरल, तुम्ही पाहिला का?