भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर आणि त्याची बहिण मालती चाहर हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. सर्वसाधारण भाऊ-बहिणींप्रमाणे ते दोघेही एकमेकांची थट्टा करण्याची संधी सोडत नाहीत. अशात विकिपीडियाने युवा क्रिकेटपटू चाहर याच्या वयात मोठी गडबड केली. अजून वयाची तिशीदेखील न ओलांडलेल्या चाहरचे वय विकिपीडियाने चक्क ४८ वर्षे लिहिले आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर, चाहरची मोठी बहीण मालती हिने त्याला ट्रोल केले आहे.
मालतीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने चाहरच्या विकिपीडियावरील प्रोफाइलचा स्क्रिनशॉट जोडला आहे. त्यावर चाहरच्या भारतीय संघातील जर्सीच्या फोटोसह खाली त्याची माहिती दिली आहे. सोबतच ७ ऑगस्ट १९७२ रोजी त्याचा जन्म झाला असून पुढे ४८ वर्षे वय असे लिहिलेले स्पष्ट दिसत आहे.
या स्क्रिनशॉटला कॅप्शन देत मालतीने लिहिले आहे की, ‘विकिपीडियाचा धन्यवाद… शेवटी तुमच्यामुळे दीपक माझ्यापेक्षा वयाने मोठा झाला आहे. ४८ वर्षांचा सर्वात तंदुरुस्त क्रिकेटपटू.’ सोबतच तिने हसतानाचे इमोजी टाकले आहेत. मालतीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मुळात चाहर याचा जन्म ७ ऑगस्ट १९९२ रोजी आग्रा येथे झाला होता. त्यानुसार सध्या त्याचे वय २८ वर्षे इतके आहे.
https://www.instagram.com/p/CKqLsb0gmlZ/?utm_source=ig_web_button_share_sheet
दीपक चाहरची क्रिकेट कारकिर्द
दीपक चाहरने जुलै २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आजवर त्याने एकूण १३ टी२० सामने खेळले असून १८ विकेट्स घेतल्या आहेत. यात ७ धावांवर ६ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी राहिली आहे. तर ३ वनडे सामन्यात खेळताना त्याने २ विकेट्स काढल्या आहेत. याव्यतिरिक्त चाहर हा आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्स संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत ४८ सामने खेळले आहेत. यादरम्यान तब्बल ४५ फलंदाजांना त्याने तंबूत धाडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND Vs ENG : अवघ्या १२ विकेट्स अन् अश्विन कसोटीतील ‘या’ शानदार विक्रमात ठरेल दुसराच
हा कसला प्रकार! क्रिकेटपटूंनी चालू सामन्यात मैदानावरच काढले कपडे, पाहा मजेशीर व्हिडिओ
पंतप्रधानांचे ट्विट रिट्विट करून फसला विराट, चाहत्यांनी धरले धारेवर