हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) गतविजेत्या संघांना कधीही नशीबाची साथ मिळालेली नाही. 2014 मध्ये आयएसएलला प्रारंभ झाल्यापासून एकाही संघाला विजेतेपद राखता आलेले नाही. पहिल्या स्पर्धेत विजेता ठरलेला अॅटलेटिको दी कोलकाता या कामगिरीच्या अगदी जवळ गेला होता. 2015 मध्ये कोलकाताने बाद फेरी गाठली होती, पण त्यांना चेन्नईयीन एफसीने हरविले. पुढे जाऊन चेन्नईयीनने विजेतेपद जिंकले.
विशेष म्हणजे कोलकाता आणि चेन्नईयीन एफसी या दोनच संघांना आयएसएल विजेतेपद मिळविता आले आहे. तसेच कोलकाताने 2014, 2016 तर चेन्नईने 2015, 2017-18 या हंगामांचे विजेतेपद पटकावले आहेत.
यंदा मात्र आश्चर्याची बाब म्हणजे हे दोन्ही संघ स्थिरावण्यासाठी झगडत आहेत. यंदाच्या मोसमात आतापर्यंत या संघांनी दोन सामने खेळले आहेत. त्यात विजयाचे खाते उघडू न शकलेले दोन संघ हेच आहेत.
चेन्नईला सुरवातीलाच दोन पराभव पत्करावे लागले आहेत. बेंगळुरू एफसी आणि एफसी गोवा या संघांकडून ते हरले. स्टीव कॉपेल यांच्या मार्गदर्शनाखाली कोलकाताचीही सुरवात खराबच झाली आहे. घरच्या मैदानावर ते केरळा ब्लास्टर्स आणि नॉर्थइस्ट युनायटेडकडून हरले आहेत. आणखी धक्कादायक बाब म्हणजे कोलकाताला अद्याप एकही गोल करता आलेला नाही तर त्यांच्या विरुद्ध या दोन संघांनी तीन गोल केले आहेत.
कॉपेल म्हणाले की, ‘’आम्हाला अपेक्षित असलेली सुरवात ही नक्कीच नाही. ही लीग 400 मीटर शर्यतीसारखी आहे. त्यामुळे आम्ही सावरू. पुढील सामन्यापूर्वी आम्हाला काही दिवसांची विश्रांती मिळाली आहे. दिल्लीविरुद्ध आमचा सामना खडतर असेल. आम्ही कसून सराव करू आणि पराभवातून सावरण्याचा प्रयत्न करू.’’
कॉपेल यांनी अनेक स्टार खेळाडू आणून संघाची फेररचना केली आहे. यात मॅन्युएल लँझरॉत (आधीचा संघ एफसी गोवा), कालू उचे (दिल्ली डायनॅमोज), जॉन जॉन्सन (बेंगळुरू एफसी) आणि एव्हर्टन सँटोस (मुंबई सिटी एफसी) या खेळाडूंचा समावेश आहे, पण इंग्लंडचे कॉपेल अजून संघात योग्य समन्वय निर्माण करू शकलेले नाहीत. त्यामुळे ते आक्रमणात सातत्य राखू शकलेले नाही.
कॉपेल यांचे संघ सुरवात संथ करतात अशी परंपरा आहे. पुढील सामन्यांत त्यांना संघाकडून बरीच अपेक्षा असेल. दिल्ली डायनॅमोजवर विजय मिळविता आल्यास लीगच्या पुढील टप्याला सुरवात चांगली होईल आणि संघ अडखळत्या मार्गावरून रुळावर येईल.
दुसरीकडे चेन्नईचे प्रशिक्षक जॉन ग्रेगरी यांच्यासमोरही समस्या आहेत. त्यांच्या बचाव फळीतील उणीवा चिंताजनक ठरल्या आहेत. जायबंदी धनपाल गणेश याच्या अनुपस्थितीत त्यांनी जर्मनप्रीत सिंग आणि इसाक वनमाल्साव्मा यांना बेंगळुरूविरुद्ध संधी दिली. त्यानंतर गोव्याविरुद्ध इसाक याच्या जागी अनिरुध थापाला पाचारण करण्यात आले, मात्र थापा आणि जर्मनप्रीत यांना गोव्याच्या मध्य फळीने त्रस्त केले. या सामन्यात चेन्नईला 1-3 असे पराभूत व्हावे लागले.
जेजे लालपेखलुआ याचा फॉर्म ही सुद्धा ग्रेगरी यांच्या काळजीची आणखी एक बाब ठरली आहे. पहिल्या दोन सामन्यांत आघाडी फळीत त्याचा खेळ नीरस ठरला होता.
ग्रेगरी हे सुद्धा कॉपेल यांच्याप्रमाणेच इंग्लंडचे आहेत. त्यांनी सांगितले की,’’ सारे दडपण हे माझे आहे. मी लिडर आहे. निकाल साध्य करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. संघाची तयारी करून घेणे आणि कामगिरी चांगली होईल हे पाहणे याची मदारही माझ्यावर आहे. इंग्लंडचे प्रशिक्षक असलेल्या दुसऱ्या संघाप्रमाणेच (एटीके) आम्हाला पराभवाचे दोन धक्के बसले आहेत.’’
चेन्नईचा पुढील सामना 18 ऑक्टोबरला नॉर्थइस्ट युनायटेड आणि कोलकाताचा जमशेदपूर विरुद्ध 21 ऑक्टोबरला आहेत. यामुळे दोन्ही संघ या मोसमातील पहिला सामना जिंकण्यास आतूर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–Video: विराट कोहली आणि कंपनीने तीव्र उन्हापासून बचावासाठी घेतला ‘आईस बाथचा’ आनंद
–अबब! अफगाणिस्तानच्या युवा खेळाडूने मारले एकाच ओवरमध्ये 6 षटकार
–नोवाक जोकोविचने जिंकले चौथ्यांदा शांघाय मास्टर्सचे विजेतेपद