महिला प्रीमियर लीग 2025 च्या लिलावात मुंबई इंडियन्सनं एका 16 वर्षीय खेळाडूवर मोठी बोली लावली. मुंबईनं तामिळनाडूच्या जी कमलिनीला तिच्या मूळ किमतीपेक्षा कितीतरी पटीनं जास्त किंमत देऊन खरेदी केलं. कमलिनीची मूळ किंमत 10 लाख रुपये होती. मात्र मुंबईनं तिला 1.60 कोटी रुपयांना खरेदी केलं. 13 वर्षीय वैभव सूर्यवंशी नुकताच आयपीएलमधील सर्वात तरुण करोडपती ठरला होता. आता महिला प्रीमियर लीगमध्ये कमलिनीच्या नावावर हा विक्रम नोंदवला जाऊ शकतो.
कमलिनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडूकडून खेळते. तिनं अनेक प्रसंगी चमकदार कामगिरी केली आहे. WPL लिलावात मुंबईनं कमलिनीवर पहिली बोली लावली. पण यानंतर दिल्ली कॅपिटल्सही या शर्यतीत सामील झाली. दिल्लीनं 1.50 कोटी रुपयांची बोली लावली. तर मुंबईनं कमलिनीला 1.60 कोटींची शेवटची बोली लावून विकत घेतलं.
कमलिनीला ‘लहान पॅकेट, मोठा धमाका’ असं म्हणतात. तिनं लहान वयातच स्फोटक खेळी करून नाव कमावलं आहे. ती भारताच्या अंडर 19 महिला संघाकडूनही खेळली आहे. कमलिनीनं 2024 अंडर 19 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात नाबाद 44 धावा केल्या होत्या. यादरम्यान तिनं 4 चौकार आणि 3 षटकार मारले होते. तिच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाला 9 गडी राखून विजय मिळाला होता.
तामिळनाडूची प्रतिभावान क्रिकेटर कमलिनी महेंद्रसिंह धोनीसारखी विकेटकीपर फलंदाज आहे. ती फलंदाजीसोबतच यष्टिरक्षणातही पारंगत आहे. ती त्रिकोणी मालिकेत भारतासाठी मालिकावीर ठरली होती. याशिवाय तिनं अंडर-19 महिलांच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 79 धावा केल्या होत्या.
हेही वाचा –
“हे ‘मूर्खासारखं क्रिकेट’….”, भारतीय गोलंदाजाच्या कामगिरीवर दिग्गज क्रिकेटर भडकला
रोहित-कोहलीपासून हार्दिक-बुमराहपर्यंत, भारताच्या स्टार क्रिकेटर्ससाठी 2024 हे वर्ष कसं राहिलं?
रोहित शर्मानं घेतला स्मिथचा अद्भुत कॅच, व्हिडिओ पाहिल्याशिवाय विश्वासच बसणार नाही!