कुस्तीपटू अंतिम पंघलवर आपल्या एंट्री कार्डद्वारे बहिणीला पॅरिसच्या क्रीडाग्रामध्ये प्रवेश मिळवून दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणावरून अंतिमवर बरीच टीका झाली आहे. यानंतर आता भारतीय ऑलिम्पिक संघटना तिच्यावर तीन वर्षांसाठी बंदी घालू शकते.
आता या घटनेवर अंतिमनं स्पष्टीकरण दिलं आहे. तिनं सांगितलं की, ती आजारी आहे आणि तिची बहीण तिची काळजी घेण्यासाठी तिथे आली होती. पीटीआयशी बोलताना अंतिम म्हणाली, माझी प्रकृती खराब झाली होती. ती म्हणाली, “काल माझी बाउट होती, मात्र त्यामध्ये माझा पराभव झाला. जे कालपासून चालू आहे की, अंतिमच्या बहीणाला पोलीस पकडून घेऊन गेले. मला पोलीस पकडून घेऊन गेले, हे खोटं आहे. माझी तब्येत खूप खराब होती. मला ताप आला होता. माझी बहीण ज्या हॉटेलमध्ये राहते, ती मला तिथे घेऊन जाणार होती. त्यासाठी मी परवानगीही घेतली होती.”
अंतिम पुढे म्हणाली, “माझं सामान क्रीडाग्राममध्येच राहिलं होतं, ज्याची मला खूप गरज होती. मला ताप आला म्हणून मी झोपी गेले. यामुळे माझी बहीण माझं कार्ड घेऊन तिथे गेली. पण तिथे माझ्या बहिणीकडून कार्ड काढून तिला पोलीस ठाण्यात पडताळणीसाठी नेण्यात आलं.”
कॅब ड्रायव्हरशी झालेल्या भांडणाच्या मुद्द्यावर अंतिम म्हणाली, “काल जेव्हा मी मॅच हारली, तेव्हा कोच दु:खी होते. आम्ही हॉटेलवर लवकर आलो, पण ते तिथेच थांबले. मग आम्ही त्यांच्यासाठी कॅब बुक केली. जेव्हा ते हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा कॅबला देण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. आम्ही हॉटेलमधून युरो आणू असं ड्रायव्हरला सांगितलं. माझे एक प्रशिक्षक आले आणि युरो देऊन गेले. यावेळी कॅब चालक थोडा संतापला. पण मारामारी असं काहीच घडलं नाही.”
हेही वाचा –
पॅरिस ऑलिम्पिक वादाच्या भोवऱ्यात; शिस्तभंग केल्याप्रकरणी भारतीय खेळाडूंची हकालपट्टी
पदक जिंकल्यानंतर मनू भाकरवर पैशांचा वर्षाव, क्रीडामंत्र्यांनी दिला इतक्या रुपयांचा धनादेश
विनेश फोगटवर सरकारने केला चक्क इतका खर्च, आकडा जाणून बसेल धक्का