क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट म्हणून सचिन रमेश तेंडुलकर हे नाव आदराने घेतले जाते. ३४ हजारपेक्षा जास्त धावा आणि तब्बल शंभर शतके ही आकडेवारी युवा खेळाडूंसाठी आदर्शवत आहे. भारतीय चाहत्यांसाठी देव असलेल्या सचिनची प्रत्येक खेळी ही आधीच्या खेळीहून “लै भारी” अशीच होती. पण जेव्हा सचिनला त्याच्या आवडीच्या खेळीबाबत विचारले तेव्हा, सचिन सांगतो, “माझ्या खास शतकांपैकी एक शतक हे केनियाविरूद्धचे ‘ते’ शतक आहे. ते शतक मी माझ्या वडिनांना अर्पण केले होते.”
सातवा विश्वचषक (विश्वचषक १९९९) इंग्लंडमध्ये सुरू झाला होता. मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची मोहिम द. आफ्रिकेच्या हातून सपाटून मार खात सुरू झाली. संभाव्य विजेते म्हणून गेलेल्या भारतीय संघासाठी ही सुरवात अपेक्षित नव्हती. द. आफ्रिकेविरुद्धच्या त्या पराभवाची कारणमीमांसा सुरू असतानाच मुंबईवरून एक बातमी आली. संघाचा प्रमुख फलंदाज सचिन तेंडुलकर यांच्या वडीलांचे आकस्मिक निधन झाले होते. पुढील सामना झिम्बाब्वेसोबत होता. व्यवस्थापनाच्या परवानगीने सचिन लगोलग भारताकडे रवाना झाला. मुंबईमध्ये सचिनच्या वडिलांचे अंत्यसंस्कार केले गेले.
तिकडे, लिस्टरमध्ये भारताला झिम्बाब्वेच्या हातून देखील तीन धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला. नवीन प्रारूपाद्वारे प्रथमच होत असलेल्या या स्पर्धेत पुढील फेरीत (सुपर सिक्स) प्रवेश करण्यासाठी भारताला पुढील येणाऱ्या सामन्यांत कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक होता. २३ मे रोजी केनियाविरूद्धचा सामना भारतासाठी ‘करा किंवा मरा’ असा झाला.
वडिलांच्या निधनाचे दुख: बाजूला ठेवून, कुटुंबाच्या सांगण्यावरून सचिन देशासाठी पुन्हा इंग्लंडला परतला. सचिन त्यावेळची आठवण सांगतो की, “मुंबईत चार दिवस घालवल्यानंतर मी इंग्लंडसाठी प्रस्थान केले. मला असे वाटत होते की, बाबांची ती इच्छा होती की पुन्हा संघात सामिल व्हावे.”
सामन्याच्या दिवशी कर्णधार अझरुद्दीनने आधीच्या सामन्यातील सलामी जोडी सदागोपन रमेश व सौरव गांगुली कायम ठेवली. नेहमी सचिन डावाची सुरूवात करायचा परंतु झिम्बाब्वेविरूद्ध मिळालेल्या संधीचा फायदा घेत रमेशने अर्धशतक झळकावले होते. द्रविड तिसऱ्या तर सचिन चौथ्या क्रमांकावर खेळणार होते.
केनियाचा कर्णधार करीम आसिफने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. गांगुलीच्या रूपाने पहिला धक्का लवकर बसला परंतु रमेश आणि द्रविडने डाव सावरला. संघ शतकाच्या नजिक असताना रमेश (४४) बाद झाला. सचिन मैदानावर प्रवेश करत असताना दोन्ही बाजूच्या प्रेक्षकांनी त्याला उभे राहून मानवंदना दिली.
आपला पहिलाच विश्वचषक खेळत असलेल्या द्रविड आणि अनुभवी सचिनने केनियाच्या गोलंदाजांची पिसे काढायला सुरुवात केली. ३० व्या षटकानंतर सचिन अधिकच आक्रमक झाला. आसिफला षटकार खेचत त्याने अर्धशतक पूर्ण केले. २९.१ षटकांत २३७ धावांची नाबाद भागीदारी करत सचिन-द्रविड दोघांनी शतके ठोकली. सचिनने १४०* (१०१ चेंडू, १६ चौकार व ३ षटकार) तर द्रविडने १०४* (१०९ चेंडू, १० चौकार) धावा केल्या.
या दोघांच्या शतकाच्या जोरावर भारताने ३२९ धावांचा डोंगर उभा केला. या धाव्यांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नंतर केनियाचा डाव अवघ्या २३५ धावात आटोपला. देवशिष मोहंतीच्या चार बळींमुळे केनियाची पुरती वाताहात झाली. भारताने ९४ धावांनी विजय संपादन करत पुढील फेरीत प्रवेश करण्याच्या आशा पल्लवित ठेवल्या.
२३ मे १९९९ ला ब्रिस्टलच्या मैदानावर शतक साजरे केल्यावर सचिनने जेव्हा आकाशाकडे पाहिले तेव्हा त्याच्यासमवेत असंख्य क्रिकेटप्रेमींच्या डोळ्याच्या कडा आपोआप पाणावल्या होत्या.
वाचनीय लेख –
असे ३ प्रसंग; जेव्हा एखाद्या क्रिकेटरची दुखापत ठरते दुसऱ्याच खेळाडूसाठी वरदान
…आणि पाकिस्तानच्या संसदेत दिली गेली सचिन बाद झाल्याची बातमी
१० तासांत २ वेगवेगळ्या देशांमध्ये २ वेगवेगळ्या संघांकडून खेळला होता मलिंगा, केला होता खास कारनामा