fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

१० तासांत २ वेगवेगळ्या देशांमध्ये २ वेगवेगळ्या संघांकडून खेळला होता मलिंगा, केला होता खास कारनामा

Lasith Malinga plays 2 matches in 2 countries in 10 hours

जागतिक क्रिकेटमध्ये दिग्गज गोलंदाजांबद्दल चर्चा करायची झाली तर लसिथ मलिंगाचे नाव त्यात आल्याशिवाय राहणार नाही. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मलिंगा म्हटलं की सर्वांना त्याची ती चेंडू फेकतानाची अनोखी शैली आणि त्याचे उडणारे कुरुळे केस आठवतात. या मलिंगाने त्याच्या अनोख्या शैलीने उत्तम यॉर्कर चेंडू टाकत आजपर्यंत अनेक मोठे विक्रम केले. त्याला ‘यॉर्कर किंग’ नावही पडले.

त्याच्या या चेंडूंवर अनेक फलंदाजांची भंबेरी उडाली आहे. याच मलिंगाने २ वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४ चेंडूत ४ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. एवढेच नाही तर वनडेत ३ वेळा हॅट्रिक घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे. मलिंगाने नेहमीच त्याची कामगिरी हे केवळ लक नसून त्याची मेहनत असल्याचे दाखवून दिले आहे. त्याशिवाय त्याला सारखीच कामगिरी एकापेक्षा अधिकवेळा करता आली नसती. एवढेच नाही तर मलिंगा त्याच्या संघाप्रती प्रचंड वचनबद्ध आहे. हे २०१९ ला एप्रिल महिन्यात दिसून आले होते. ज्यावेळी त्याने १० तासात २ सामने खेळले होते आणि तेही २ वेगवेगळ्या देशात. त्यातही त्या २ सामन्यात मिळून १० विकेट्स घेतल्या होत्या.

झाले असे की मलिंगा २०१९ चा आयपीएल मोसम मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. या आयपीएल मोसमानंतर लगेचच वनडे विश्वचषकाला सुरुवात होणार होती. त्यामुळे बरेचसे संघ त्यांच्या संघबांधणीच्या तयारीला एप्रिलमध्ये लागले होते. यात श्रीलंकेचा संघही होता. त्यावेळी श्रीलंकेच्या निवड समीतीने त्यांच्या खेळाडूंना विश्वचषकाला पात्र ठरण्यासाठी ४ एप्रिल ते ११ एप्रिल दरम्यान होणाऱ्या सुपर प्रोविंशियल वनडे टूर्नामेंट या देशांतर्गत स्पर्धेत खेळण्यास सांगितले होते.

३५ वर्षीय मलिंगासाठी हा विश्वचषक महत्त्वाचा होता कारण तो त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा विश्वचषक होता. त्यामुळे त्याला श्रीलंकेला परतणे गरजेचे होते. पण त्याचवेळी तो मुंबई इंडियन्स संघाचा भागही होता. त्यामुळे त्याने अखेर ३ एप्रिलला चेन्नई सुपर किंग्सविरुद्धचा महत्त्वाचा सामना खेळून मग श्रीलंकेला जाण्याचा निर्णय घेतला. तो या मधल्या काळात मुंबईच्या ३ सामन्यांना मुकणार होता. पण हे सुरुवातीचे सामने होते, ही मुंबईसाठी त्यातल्या त्यात चांगली गोष्ट होती.

मलिंगाने खेळले १० तासात २ सामने  –

३ एप्रिलला रात्री ८ वाजता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघातील सामना वानखेडे स्टेडियमवर सुरु झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना १७० धावा करत चेन्नई सुपर किंग्सला १७१ धावांचे आव्हान दिले. यावेळी मलिंगाने उत्तम गोलंदाजी प्रदर्शन करत ४ षटकात गोलंदाजी करताना ३४ धावा देत ३ विकेट घेतल्या होत्या आणि मुंबईला ३७ धावांनी विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती.

हा सामना ३ एप्रिलला रात्री ११ वाजून ५५ मिनिटादरम्यान म्हणजेच मध्यरात्रीपर्यंत संपला. त्यानंतर मलिंगा लगेचच श्रीलंकेला रवाना झाला. तो रात्री पावणेदोनच्या सुमारास श्रीलंकेला जाण्यासाठी निघाला होता. तो ४ एप्रिलला पहाटे ४.३० पर्यंत श्रीलंकेला पोहचला. तिथून तो सकाळी ७ वाजेपर्यंत कँडीला देशांतर्गत वनडे सामना खेळण्यासाठी गेला. त्यांनतर तो काही वेळात सकाळी ९.४५ वाजता कँडीविरुद्धच्या सामन्यासाठी गाले संघाकडून मैदानात उतरला.

विशेष म्हणजे गालेकडून वनडे सामना खेळताना ९.५ षटकात ४९ धावा देत त्याने तब्बल ७ विकेट्स घेतल्या. त्यामुळे गाले संघाने कँडीविरुद्ध १५६ धावांनी सहज विजय मिळवला. खास गोष्ट म्हणजे या सामन्यात गालेचे नेतृत्वही मलिंगाने केले.

म्हणजे साधारण १० तासात मलिंगा दोन सामने खेळला. एक टी२०चा आणि एक वनडेचा. तेही भारत आणि श्रीलंका या दोन वेगवेगळ्या देशात. त्यातही कमालीची गोष्ट म्हणजे त्याने दोन्ही सामन्यात त्याच्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

बरं इतके कष्ट कशासाठी असे विचारल्यावर हा अवलिया मलिंगा म्हणतो, ‘मला युवा खेळाडूंना दाखवायचे होते की एका आंतरराष्ट्रीय खेळाडूने आपल्या संघाप्रती कसे वचनबद्ध असले पाहिजे. मला वाटतं ते यातून काहीतरी धडा घेतील.’

असा हा मलिंगा आत्तापर्यंत ३० कसोटी, २२६ वनडे आणि ८४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळला आहे. त्याने कसोटी आणि वनडेतून निवृत्ती घेतली असून टी२० मध्ये तो सक्रिय आहे. त्याने कसोटीत १०१ विकेट्स, वनडेत ३३८ विकेट्स आणि आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १०७ विकेट्स घेतल्या आहेत. तो आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये १०० पेक्षा अधिक विकेट्स घेणारा सध्यातरी एकमेव गोलंदाज देखील आहे.

वाचनीय लेख –

आयपीएलमध्ये ‘या’ ५ खेळाडूंना मिळाले क्षमतेपेक्षाही अधिक पैसे, पण कामगिरीच्या बाबतीत मात्र…

जेव्हा १०व्या व ११व्या क्रमांकाच्या गोलंदाजांनी फलंदाजीत केला होता कहर

अतिशय वाईट भारतीय कर्णधार, जो विरोधी संघातील गोलंदाजांना द्यायचा सोन्याची घड्याळं भेट

You might also like