विश्वचषक 2023 स्पर्धेत दणादण दोन सामने जिंकणाऱ्या पाकिस्तान संघाला पुढील दोन्ही सामन्यात दारुण पराभवाचा सामना करावा लागला. आधी तिसऱ्या सामन्यात भारताने आणि आता चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पराभवाची धूळ चारली. विश्वचषकाचा 18वा सामना शुक्रवारी (दि. 20 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघात एम चिन्नास्वामी स्टेडिअम, बंगळुरू येथे पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलियाने 62 धावांनी जिंकला. या सामन्यात पराभूत होताच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने मोठे विधान केले. तो म्हणाला की, आम्हाला एका मोठ्या खेळीची गरज होती, जी मिळाली नाही.
काय म्हणाला बाबर?
सामन्यानंतर बाबर आझम (Babar Azam) म्हणाला, “पहिल्या 34 षटकात आम्ही चांगले प्रदर्शन केले नाही. वॉर्नरसारख्या खेळाडूचा झेल सोडला, तर तो तुम्हाला सोडणार नाही. या स्तरावरील खेळाडूंना जीवनदानाच्या संधीचा फायदा घेणे माहितीये. प्रकाशाखाली चेंडू बॅटवर चांगल्याप्रकारे येत होता. आम्हाला एका मोठ्या खेळीची गरज होती, जी आम्हाला मिळू शकली नाही. पहिल्या 10 षटकांमध्ये चेंडूने चांगली कामगिरी आणि मधल्या षटकांमध्ये बॅटने चांगली कामगिरी करण्याची गरज आहे.”
विजयाच्या मार्गावर ऑस्ट्रेलिया
पाच वेळचा विजेता ऑस्ट्रेलिया संघ स्पर्धेत पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर परतला. सुरुवातीला त्यांना सलग दोन सामन्यात पराभूत व्हावे लागले. मात्र, आता या विजयासह त्यांनी चांगले पुनरागमन केले. ऑस्ट्रेलियाने बंगळुरूच्या मैदानावर पाकिस्तानी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. सलामीवीर डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी शतके ठोकली. मार्शने 121, तर वॉर्नरने 163 धावा चोपल्या.
या जोडगोळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 9 विकेट्स गमावत 367 धावांचा भलामोठा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ 45.3 षटकात 305 धावांवर सर्वबाद झाला. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून ऍडम झम्पा याने कमाल केली. त्याच्यापुढे पाकिस्तानी फलंदाज टिकू शकले नाहीत. त्याने 10 षटकात 53 धावा खर्चून सर्वाधिक 4 विकेट्स नावावर केल्या. या विजयासह ऑस्ट्रेलिया संघ पॉईंट्स टेबलमध्ये पाकिस्तानच्या जागी म्हणजेच चौथ्या स्थानी विराजमान झाला. तसेच, पाकिस्तानची पाचव्या स्थानी घसरण झाली. (world cup 2023 18th match aus vs pak captain babar azam statement after lose match against australia)
हेही वाचा-
श्रीलंका विश्वचषकातील पहिला विजय मिळवणार की नेदरलँड्स बदला घेणार? जाणून घ्या सामन्याविषयी सर्वकाही
ऑस्ट्रेलियाचा सर्वसमावेशक विजय! हाय स्कोरिंग सामन्यात पाकिस्तानला नमवलं, गुणतालिकेत खळबळ