बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेत लय पकडली आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात दारुण पराभव पत्करल्यानंतर पुढील दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाने शानदार विजय मिळवला. शुक्रवारी (दि. 20 ऑक्टोबर) बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर ऑस्ट्रेलियन संघाने पाकिस्तानी गोलंदाजांच्या नाकी नऊ आणल्या. हा सामना ऑस्ट्रेलियाने 62 धावांनी जिंकला. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याचा आनंद गगनाला भिडला. त्याने खेळाडूंवर स्तुतीसुमने उधळली.
झाले असे की, या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नर (David Warner) आणि मिचेल मार्श (Mitchell Marsh) हे दोघेच चमकले. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी तब्बल 259 धावांची द्विशतकी भागीदारी झाली. याच जोरावर ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 9 विकेट्स गमावत 367 धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाचा डाव 45.3 षटकात 305 धावांवरच सर्वबाद झाला.
पॅट कमिन्स खुश
विजयानंतर पॅट कमिन्स म्हणाला की, “एक चांगला विजय होता. चिन्नास्वामी मैदानावर खेळणे खूपच कठीण असते, पण शानदार विजय मिळाला. सलामी फलंदाजांनी जबरदस्त खेळ दाखवला. वनडे क्रिकेटमधील हीच महत्त्वाची गोष्ट असते. मोठी खेळी करायची असते, जशी आमच्या सलामी फलंदाजांनी केली. ऍडम झम्बाने लाजवाब गोलंदाजी केली आणि आपली क्षमता दाखवली. बाबर आणि इफ्तिखारची विकेट आमच्यासाठी मोठी होती. आम्ही दोन विजय मिळवले आहेत आणि पुढील सामन्यासाठी आमच्याकडे थोडा वेळ आहे. आम्ही मागील दोन सामन्यात बेंचमार्क सेट केला आहे आणि हा पुढेही कायम ठेवू इच्छितो.”
गोलंदाजी आणि फलंदाजी
या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागाने चमकदार कामगिरी केली. फलंदाजीत वॉर्नरने सर्वाधिक 163 धावा केल्या, तर मार्शनेही 32व्या वाढदिवशी 121 धावांची वनडे कारकीर्दीतील सर्वोच्च खेळी केली. दुसरीकडे, गोलंदाजीत ऍडम झम्पा याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच, पॅट कमिन्स आणि मार्कस स्टॉयनिस यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्यांच्याव्यतिरिक्त मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूड यांनीही प्रत्येकी 1 विकेट घेतली. (world cup 2023 18th match aus vs pak pat cummins statement after win the match against pakistan)
हेही वाचा-
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत होताच बाबरने वाचला चुकांचा पाढा; म्हणाला, ‘त्याचा कॅच सोडला, तर तो तुम्हाला…’
श्रीलंका विश्वचषकातील पहिला विजय मिळवणार की नेदरलँड्स बदला घेणार? जाणून घ्या सामन्याविषयी सर्वकाही