आयसीसी वनडे विश्वचषक 2023 सध्या रंगात आला आहे. पाच वेळचा विश्वचविजेता ऑस्ट्रेलिया संघ यावर्षी देखील विजेतेपदासाठी दावेदार मानला जात आहे. मात्र ऑस्ट्रेलियासाठी या विश्वचषक हंगामाची सुरुवात अपेक्षित पद्धतीने होऊ शकली नाही. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभव स्वीकारावा लागला. अशात मालिकेतील तिसरा सामना खेळण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णदार पॅट कमिन्स याच्याकडून खास प्रतिक्रिया आली आहे.
वनडे विश्वचषक 2023 (WC 2023) मधील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने यजमान भारतीय संघासोबत खेळला. या सामन्यात भारताने 6 विकेट्स राखून पाहुण्यांना मात दिली. विश्वचषकातील दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध खेळला आणि तब्बल 134 धावांनीपराभव स्वीकारला. विशेष म्हणजे विश्वचषक स्पर्धा सुरू होण्याआधी ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिका आणि भारताविरुद्ध वनडे मालिका खेळल्या होत्या. या दोन्ही वनडे मालिकांमध्ये देखील ऑस्ट्रेलियन संघ पराभूत झाला होता. असे असले तरी, कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) घाबरला नाहीये.
ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका (AUS vs SL) यांच्या सोमवारी (16 ऑक्टोबर) विश्वचषक 2023 मधील 16 वा सामना खेळला जाणार आहेत. त्याआधी कमिन्सने माध्यमांशी चर्चा केली. कमिन्सच्या मते पहिल्या दोन सामन्यात पराभव मिळाल्यानंतर पुढच्या सामन्यांमधील विजय संघासाठी जास्त कठीण नसेल. कमिन्स म्हणाला, “आता आमच्याकडे अशा संघांविरुद्ध खेळण्याची संधी आहे, ज्यांच्याविरुद्ध आम्ही आधी खेळलो नाहीये आणि आम्हाला त्यांच्याविरुद्ध चांगले यश देखील मिळाले आहे. त्यामुळे आम्ही या संघांविरुद्ध खेळण्यासाठी आत्मविश्वासासह मैदानात उतरू.”
“विश्वचषकात आमची सुरुवात चांगली झाली नाहीये. आता प्रत्येक खेळाडूला हवा असलेला निकाल मिळवायचा आहे. पहिले दोन सामने आम्ही गमावले आहेत. आता विजय मिळवायला सुरुवात करावी लागेल, तेदेखील लवकरात लवकर. आता प्रत्येक सामना म्हणजे अंतिम सामन्याप्रमाणे झाला आहे. आता आम्हाला प्रत्येक सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे,” असेही कमिन्स पुढे म्हणाला.
दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाला विश्वचषकच्या ग्रुप स्टेजमध्ये अजून सात सामने खेळायचे आहेत. यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका, पाकिस्तान, नेदर्लंड्स, न्यूझीलंड, इंग्लंड, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे संघ खेळतील. माध्यमांतील वृत्तांनुसार उपांत्य फेरीत जागा पक्की करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला या सात पैकी सहा सामने जिंकावे लागतील. (Pat Cummins reacts to the upcoming matches of World Cup 2023)
महत्वाच्या बातम्या –
बुमराहच्या भीतीने ‘या’ ऑस्ट्रेलियन कर्णधाराने घेतली निवृत्ती, चालू विश्वचषकात दिग्गजाचा सनसनाटी खुलासा
इंग्लंडपुढे अफगाणिस्तानने दाखवला दम! गतविजेत्यासमोर 285 धावांचे आव्हान